मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा
By admin | Published: February 21, 2015 02:00 AM2015-02-21T02:00:52+5:302015-02-21T02:00:52+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात व्यवहारामध्ये मराठी भाषा वापरली जात असली तरी फारसी, उर्दू भाषांच्या प्रभावामुळे राजमान्यता मात्र नव्हती.
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात व्यवहारामध्ये मराठी भाषा वापरली जात असली तरी फारसी, उर्दू भाषांच्या प्रभावामुळे राजमान्यता मात्र नव्हती. मराठी भाषा लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून सगळे व्यवहार शिवाजी महाराज मराठीतून करीत असत. मातृभाषेचे महत्त्व ओळखणारे शिवाजी महाराज हिंदुस्थानातील पहिले राजे होते, असे मत ज्येष्ठ लेखक हरी नरके यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संयोजन समितीतर्फे महाराष्ट्र साहित्य परिषद आणि सरहद संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी भाषा या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी सरहद संस्थेचे संचालक संजय नहार, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, परिषदेचे स्वागताध्यक्ष भारत देसडला, प्रकाश पायगुडे, सुनील महाजन आदी या वेळी उपस्थित होते.
नरके म्हणाले, की मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा. येत्या आठवडाभरात ही घोषणा झाल्याशिवाय राहणार नाही. केंद्र शासनाने ठरविलेले सर्व निकष मराठी भाषा पूर्ण करते. त्यामुळे भाषेला विशेष दर्जा देण्यासंदर्भातील निर्णय येत्या आठवडाभरात होईल. भालचंद्र नेमाडे यांनी राग सोडावा, राग वैयक्तिक स्वरूपाचे असतात, त्याचा सामाजिक परिणाम होऊ नये. ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याबद्दल साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर सत्कार करण्याची आमची इच्छा आहे, असे माधवी वैद्य यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मातृभाषेला कमी लेखू नये
४मराठी भाषेचं वय हे दोन ते अडीच हजार वर्षांचं आहे. मराठी भाषेच महत्त्व खूप मोठं आहे. आपल्या मातृभाषेला कमी लेखता कामा नये. मराठी संस्कृतमधून जन्माला आलेली नसून, ती संस्कृतच्या आधी जन्माला आलेली आहे. मराठी भाषा संस्कृतची मुलगी नाही, तर मराठी संस्कृतची मावशी आहे, असे मत हरी नरके यांनी व्यक्त केले.