तिकीट कुणालाही द्या, निवडून आणण्याचा काँग्रेसचा निर्धार पक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 06:25 PM2019-03-21T18:25:16+5:302019-03-21T18:31:09+5:30
गेला महिनाभर काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची चर्चा शहरात सुरू आहे. बाहेरचा उमेदवार लादू नका असा ठरावही एकदोन वेळा करून झाला आहे.
पुणे : उमेदवारी कोणाला द्यावी हे आपण पक्षाला सुचवले आहे, आता निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. त्यामुळे आता पक्षाने कोणीही उमेदवार देऊ द्या, आपण त्याचे काम जोरात करू असा निर्धार काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मंगळवारी काँग्रेसभवनमध्ये करण्यात आला. पदफेऱ्या, चौकसभा, मोठ्या सभा यांचे नियोजन बैठकीत करण्यात आले. तसेच ठिकठिकाणी कार्यकर्त्यांचे मेळावे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
माजी आमदार मोहन जोशी, महापालिकेतील पक्षाचे गटनेते अरविंद शिंदे हे इच्छुक तसेच शहराध्यक्ष रमेश बागवे, शहर सरचिटणीस रमेश अय्यर, नगरसेवक अजित दरेकर व अन्य काही प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. गेला महिनाभर काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची चर्चा शहरात सुरू आहे. बाहेरचा उमेदवार लादू नका असा ठरावही एकदोन वेळा करून झाला आहे. पत्रक तर कितीतरी प्रसिद्ध केली आहेत. थेट पक्षाध्यक्षांनाही तक्रारी पाठवण्यात आल्या आहेत. अनेकांची नावे संभाव्य उमेदवार म्हणून सातत्याने घेतली जात आहेत व लगेचच त्याला विरोधही जाहीरपणे केला जात आहे.
या सगळ्याची दखल शहराध्यक्ष बागवे यांनी घेतली. ते म्हणाले, सत्ताधारी भाजपा त्यांच्या पक्षात काँग्रेससह अनेक पक्षांमधील उमेदवार घेत आहे. याचे कारण त्यांना जागा महत्वाच्या वाटतात. आपल्या पक्षालाही तसे वाटले तर त्यात गैर काहीच नाही. जाहीर पत्रके, बैठकांमधील मतभेदांची माहिती प्रसार माध्यमांपर्यंत पोहचली तर त्यातून पक्षाची हानी होते. मतदारांमध्ये पक्षाबाबत गैरसमज निर्माण होतात. त्यामुळे आता आपण आपली मते स्पष्टपणे पक्षाला कळवली आहेत. आता पक्ष देईल त्या उमेदवाराचे काम आपण करणे गरजेचे आहे. पक्षाला विजय मिळणे महत्वाचे आहे.
अन्य पदाधिकाऱ्यांनीही भाषणात असेच मत व्यक्त केले. शहरातील महत्वाच्या ठिकाणांची चर्चा यावेळी झाली. काँग्रेसचे मतदान कुठे आहे तिथे संपर्क करण्याच्या जबाबदाऱ्या काही ज्येष्ठांवर सोपवण्यात आल्या. निवडणूक आचारसंहितेबाबतचे सर्व काम, चौक सभांचे नियोजन, वक्त्यांची यादी, मोठ्या सभांची संभाव्य ठिकाणे याबाबतही चर्चा करण्यात आली. येत्या एकदोन दिवसात उमेदवार जाहीर होईल, त्यापूर्वी सर्व प्राथमिक तयारी पूर्ण करण्याच्या सुचना बागवे यांनी दिल्या.