प्राचार्य भरतीवरील बंदी शासनाने उठवली : महाविद्यालयांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 09:00 PM2018-04-23T21:00:44+5:302018-04-23T21:00:44+5:30

राज्य शासनाने ९ जून २०१७ पासून महाविद्यालयातील प्राचार्य पदे भरण्याच्या प्रक्रियेवर निर्बंध घातले होते. त्यामुळे महाविद्यालयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.

Government lifted ban on principal recruitment : relief to colleges | प्राचार्य भरतीवरील बंदी शासनाने उठवली : महाविद्यालयांना दिलासा

प्राचार्य भरतीवरील बंदी शासनाने उठवली : महाविद्यालयांना दिलासा

Next
ठळक मुद्देरिक्त जागा भरण्याचा मार्ग मोकळा, सध्या राज्यभरात प्राचार्यांच्या २६१ जागा रिक्तआता प्राध्यापक भरतीची बंदी कधी उठणार याकडे सगळयांचे लक्ष महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरतीची प्रक्रियाही लवकरच सुरू केली जाणार

पुणे : महाविद्यालयांमधील प्राचार्य पदांची भरती करण्यावर असलेले निर्बंध उठविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने सोमवारी घेतला. त्यानुसार तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश शिक्षण संचालक धनराज माने यांनी सर्व विद्यापीठांचे कुलसचिव व विभागीय सहसंचालकांना दिले आहेत. राज्य शासनाने ९ जून २०१७ पासून महाविद्यालयातील प्राचार्य पदे भरण्याच्या प्रक्रियेवर निर्बंध घातले होते. त्यामुळे महाविद्यालयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. सध्या राज्यभरात प्राचार्यांच्या २६१ जागा रिक्त आहेत तसेच सेवानिवृत्तीमुळे त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभुमीवर रिक्त असलेल्या व भविष्यात रिक्त होणाऱ्या सर्व जागांवर प्राचार्यांची नियुक्ती करण्याचा मार्ग शासनाकडून मोकळा करण्यात आला आहे.
महाविद्यालयामधील प्राचार्य हे एकाकी पद आहे. प्राचार्य हे कार्यालय प्रमुख म्हणून कार्यरत असतात. महाविद्यालयातील दैनंदिन प्रशासकीय तसेच शैक्षणिक कामकाजाच्या दृष्टीने तसेच राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती प्रमाणन मिळण्याकरिता नियमित प्राचार्य कार्यरत असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर प्राचार्य पदाचा प्रभारी कार्यभार हा ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ ठेवता येत नाही. त्यामुळे महाविद्यालयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. यापार्श्वभुमीवर उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील रिक्त असलेली प्राचार्यांची पदे भरण्यासाठी शासनाकडून मान्यता देत असल्याचे परिपत्रक उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून काढण्यात आले आहे. शासनाकडून प्राचार्य पदाच्या भरतीला मान्यता देण्यात आल्यानंतर त्यानुसार कार्यवाही करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. उपसंचालक कार्यालयाकडून प्राचार्य भरतीसाठी ना हरकत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सहायक प्राध्यापक भरतीकडे लक्ष
राज्यातील प्राचार्य भरतीवरील बंदी राज्य शासनाने उठविली असली तरी सहायक प्राध्यापक भरतीवर असलेले निर्बंध अद्याप कायम आहेत. प्राध्यापक भरतीवर असलेल्या बंदीमुळे राज्यातील सहायक प्राध्यापक पदाच्या शेकडो जागा रिक्त आहेत. त्याचा मोठा परिणाम महाविद्यालयांच्या गुणवत्तेवर होत आहे. प्राचार्य भरतीची बंदी उठविल्यानंतर आता प्राध्यापक भरतीची बंदी कधी उठणार याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे.
..........
 ‘‘महाविद्यालयांमध्ये प्राचार्य या संवर्गाचे पद हे एकाकी पद आहे, तसेच त्यांच्यावर कार्यालय प्रमुखाची जबाबदारी आहे. त्यामुळे महाविद्यालयात रिक्त असलेली प्राचार्यांची पदे भरण्याची प्रक्रिया शासनाच्या आदेशानुसार सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरतीची प्रक्रियाही लवकरच सुरू केली जाणार आहे.’’
- धनराज माने, संचालक, उच्च शिक्षण विभाग 

Web Title: Government lifted ban on principal recruitment : relief to colleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.