सुसंस्कृत समाज उभारणीसाठी ग्रंथोत्सव आवश्यक : लक्ष्मीकांत देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 03:44 PM2018-01-23T15:44:38+5:302018-01-23T15:47:27+5:30
पुस्तके माणसाचे व्यक्तिमत्व घडवितात. फक्त अभ्यासक्रमावर भर न देता अवांतर वाचनावर भर द्या. वाचाल तर समृद्ध व्हाल, अशा शब्दात ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी वाचनाचे महत्त्व उलगडले.
पुणे : पुस्तके माणसाचे व्यक्तिमत्व घडवितात. पुस्तकांशी मैत्री करा. फक्त अभ्यासक्रमावर भर न देता अवांतर वाचनावर भर द्या. वाचाल तर समृद्ध व्हाल, अशा शब्दात ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी वाचनाचे महत्त्व उलगडले.
राजमाता जिजाऊ माँ साहेबांच्या जयंतीनिमित्त शिवशंभो ग्रंथालयाच्या वतीने आयोजित केलेल्या ग्रंथालयाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, सहाय्यक ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर, लेखिका विद्या जाधव, शिवशंभो ग्रंथालयाचे अध्यक्ष विकास टिंगरे पाटील तसेच नगरसेविका किरण जठार, सतीश म्हस्के , शांताराम कुंजीर, सोपान पवार, मुख्याध्यापक महेश पडवळ, नगरसेवक अनिल टिंगरे, नितीन टिंगरे आणि महेश टिंगरे उपस्थित होते.
देशमुख यांनी पुस्तके आपल्याला विज्ञानवाद, विवेकवाद आणि मानवतावाद शिकवितात. त्यामुळे माणूस खऱ्या अर्थाने आधुनिक बनतो. वाचाल तर समृद्ध व्हाल असे सांगितले.
विठ्ठल जाधव म्हणाले, की पुस्तकांनी आत्मविश्वास वाढतो. पुस्तकं वाचायला हवीत, म्हणून पुस्तकांच्या खरेदीसाठी स्वत: च बजेट ठेवा. पुस्तक तुम्हाला घडवतील.
क्षीरसागर यांनी सोशल मीडियामुळे वाचन कमी होत आहे. खऱ्या अर्थाने समृद्ध व्हायचे असेल तर वाचनावर भर द्यावा याकडे लक्ष वेधले.
या कार्यक्रमात धनेश्वर विद्यालयाला पुस्तकपेट्या देऊन शिवशंभो ग्रंथालयाने दत्तक योजनेअंतर्गत दत्तक घेतले.