हिरवा निसर्ग हा भवतीने....गीत गा रे...
By Admin | Published: July 28, 2014 05:29 AM2014-07-28T05:29:48+5:302014-07-28T05:29:48+5:30
पावसाळ्याच्या दिवसांतील एक नयनरम्य आणि सर्व पर्वतरांगांनी हिरवा शालू परिधान केलेल्या माळशेज घाट परिसरात आल्यानंतर वरील गाण्याच्या ओळी आपोआप ओठांवर आल्या नाही तर नवलच...!
अशोक खरात, खोडद
हिरवा निसर्ग हा भवतीने...
जीवन सफर करा मस्तीने...
मन सरगम छेडा रे... गीत गा रे जीवनाचे...
धुंद व्हा रे...!
पावसाळ्याच्या दिवसांतील एक नयनरम्य आणि सर्व पर्वतरांगांनी हिरवा शालू परिधान केलेल्या माळशेज घाट परिसरात आल्यानंतर वरील गाण्याच्या ओळी आपोआप ओठांवर आल्या नाही तर नवलच...! सर्वत्र पसरलेली हिरवीगार हिरवळ... हिरवळीत अधूनमधून डोकं वर काढून वाऱ्याच्या तालावर डोलणारी रंगीबेरंगी रानफुले... उंचचउंच काळ्याभिन्न कड्यांवरून फेसाळत वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे... स्वर्गरूपी निसर्गाच्या सौंदर्याला बाधा पोहोचविणारे काही विकृत पर्यटक... असे चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते. मात्र, अशा सौंदर्यप्राप्त माळशेज घाटाचा इतिहास किंवा त्याची भौगोलिक व नैसर्गिक माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.माळशेज घाटाच्या इतिहासाविषयी माहिती देताना खोडद येथील पर्यावरण अभ्यासक सुभाष कुचिक म्हणाले, की माळशेज घाटाला शेकडो वर्षांचा इतिहास असून, प्राचीन महामार्गातील एक महत्त्वाचा घाटमार्ग म्हणून माळशेजचे महत्त्व आहे. सातवाहनकाळात पैठण (प्रतिष्ठाण) ही राजधानी भरभराटीला येत होती. त्याचबरोबर बाहेरील देशांबरोबरच्या व्यापारातही वाढ होत होती. दोन हजार वर्षांपूर्वीची ही व्यापारी पद्धत अभ्यासनीय आहे. पश्चिमेकडून रोम, भूमध्य समुद्र प्रदेशातील व्यापारी आपली जहाजे घेऊन भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील बंदरावर आपापला विविध प्रकारचा माल घेऊन उतरत असत. चौल, सोफारा, कल्याण, दाभोळ व वरच्या बाजूला भडोच येथील बंदरावरून अशा व्यापाऱ्यांची गर्दी असायची, मग तेथून हा माल बैलगाड्या, खेचरे, घोडे यावर लावून देशाच्या विविध भागांत पोहोचविला जायचा. पण कोकणातून देशावर येण्यासाठी सह्याद्रीच्या पर्वतरांगा ओलांडाव्या लागत. पण तरीही त्या वेळच्या राज्यकर्त्यांनी सह्याद्रीमध्ये अनेक घाट प्रचलित केले. त्यापैकीच हा आपला आवडता माळशेज घाट...!