कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गुणवंत मुलांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 02:43 PM2018-01-31T14:43:32+5:302018-01-31T14:55:13+5:30
कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतीच्यावतीने कचरा वेचकांच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. गंज पेठेत झालेल्या या कार्यक्रमामध्ये १० वी व १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
पुणे : शतकानुशतके शिक्षणाचा अधिकार नाकारल्या गेलेल्या वर्गाला शिक्षित करण्यासाठी समाजाने पाठिंबा देण्याची आवश्यकता आहे. कचरा उचलून गुजराण करणे, कचराच उपजीविकेचे साधन होणे यापेक्षा वाईट आणखी काय असू शकते. या कामाचा आदर आणि सन्मान केला जात नाही. याच भुकेने आपल्याला एकत्र आणले आहे. कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत जातीभोवती बांधली गेली नसल्याचे मत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केले.
कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतीच्यावतीने कचरा वेचकांच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. गंज पेठेतील सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमामध्ये १० वी व १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. संघटनेचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. यावेळी संघटनेच्या पौर्णिमा चिकरमाने, लक्ष्मी नारायण, सुमन मोरे आदी उपस्थित होत्या.
डॉ. आढाव म्हणाले, ‘पुणे महानगर पालिकेच्या एकूण कामांपैकी २० टक्के काम कचरा वेचक करतात. स्वच्छ संस्थेच्या माध्यमातून स्वच्छतेसंदर्भातील मोलाचे काम करुन दाखवून दिले आहे.’
यावेळी सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट एज्युकेशन, टेक महिंद्रा, एस. एन. डी. टी., एस. के. एफ. फाउंडेशन, प्रयास, स्वच्छ, अभय अभियान, हरिती प्रकाशन, आयुका, लाईट हाउस अशा अनेक संस्थांनी मार्गदर्शनपर स्टॉल्स लावले होते. आगळ्या वेगळ्या पद्धतीची व्यसन, पुरुषसत्ताक, भांडवलशाही, कौटुंबिक हिंसाचार आदी विषयांवरील दहीहंडी बांधण्यात आली होती. यावेळी तरुणांनी अन्याय सहन करणार नाही आणि अन्याय होऊ देणार नाही अशी शपथ घेतली. मद्यपान, व्यसनाधिनतेवर नाटक सादर केले.
‘जर संधी मिळाली तर आमची मुलेही नक्कीच पुढे जाऊ शकतील. आमच्यासारख्या कचरा वेचकांच्या मुलांचा झालेला सत्कार पाहून खूप आनंद झाला आहे. यामधून मुलांना नक्कीच प्रेरणा मिळेल.’ अशा शब्दात कोंढव्यात राहणाऱ्या कचरा वेचक अप्सरा शेख यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.
माझे पालक कचरा वेचक असून माझे पालक कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतीचे सभासद आहेत. दहावी नापास झाल्यानंतर चहाच्या टपरीवर काम करायला सुरुवात केली. अनेक एसी आॅफिसेसमध्ये चहा देत असताना आपणही शिकायला हवे अशी जाणिव झाली. नवी स्फूर्ती घेऊन मी पुन्हा शिक्षणाकडे वळलो. माझे बी. कॉम. पूर्ण केले. आता मी स्वच्छ सेवा सहकारी संस्थेमध्ये प्रभाग समन्वयक म्हणून काम करीत आहे. संघटनेने दिलेल्या पाठबळावर माझी वाटचाल होऊ शकली.
- वैभव