घोडेस्वारीचा थरारक अनुभव; पुण्यातील रेसकोर्स येथे राष्ट्रीय घोडेस्वारी अजिंक्यपद स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 11:58 AM2017-11-17T11:58:48+5:302017-11-17T12:01:56+5:30
रेसकोर्स येथे चार दिवस ‘राष्ट्रीय घोडेस्वार अजिंक्यपद स्पर्धा’ होत आहे. या वेळी साउथर्न कमांडचे लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
पुणे : धावणाऱ्या घोड्यावरून तिरंगा फडकाविल्यानंतर उपस्थितांच्या टाळ्यांचा कडकडाट झाला आणि या तिरंग्याला घोड्यावर उभे राहून दिलेली सलामी उपस्थितांची मने जिंकणारी होती. हा अप्रतिम मनमोहक, शिस्तबद्ध सोहळा अनुभवण्याची संधी गुरुवारी मिळाली.
निमित्त होते साउथर्न स्टार हॉर्स २०१७ चे. रेसकोर्स येथे चार दिवस ‘राष्ट्रीय घोडेस्वार अजिंक्यपद स्पर्धा’ होत आहे. या वेळी साउथर्न कमांडचे लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सदर्न कमांडचे अधिकारी, विविध शाळांचे विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. स्पर्धेत देशभरातील शंभर घोडस्वारांनी सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा १९ नोव्हेंबरपर्यंत रेसकोर्स येथे चालणार आहे.
स्पर्धेत देशभरातील अनेक घोडेस्वार सहभागी झाले असून, यामध्ये मुलींचाही सहभाग आहे. स्पर्धेत अकरा अडथळ्यांचा समावेश आहे. घोडेस्वाराला कोणतीही चूक न करता हे अडथळा पूर्ण करायचे आहेत. आज झालेल्या स्पर्धेत बहुतांश स्पर्धकांनी दोन चुका केल्यामुळे त्यांना स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले. अनेकदा अडथळा पार करताना घोड्याने मनाई केली. तेव्हा अनेक घोडेस्वारांनी पुन्हा त्या घोड्यामध्ये व स्वत:मध्येही आत्मविश्वास जागवून अडथळा पार करून उपस्थितांची मने जिंकली.
एनडीएला सुवर्णपदक
पहिल्या दिवशीच्या संघाच्या गटात नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीला (एनडीए) सुवर्णपदक मिळाले, तर संदीप शेप याने एकल गटात विजेतेपद पटकावले. मुलांच्या शो जंपिंगमध्ये ओसामा जेथवॉलने सुवर्णपदक मिळविले. नोव्हाईस शो जंपिंगमध्ये पी. जे. सपकाळ विजेते ठरले.