हास्ययोगाद्वारे आलेले हास्य हदयातून येते : मुक्ता टिळक; पुण्यात ‘हास्ययोग’चा वर्धापनदिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 05:27 PM2017-12-19T17:27:56+5:302017-12-19T17:33:20+5:30
पुणेकरांना या हास्याचा अनुभव देण्याचे काम हास्ययोग परिवार देत आहे, असे प्रतिपादन महापौर मुक्ता टिळक यांनी केले. नवचैतन्य हास्ययोग परिवार संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित हास्ययोग आनंद मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
पुणे : हास्ययोगाद्वारे आलेले हास्य हे कृत्रिम नसून, ते हृदयातून येते अशा हास्याने आपल्या शरीराची आणि मनाची खूप चांगली जोपासना होते. पुणेकरांना या हास्याचा अनुभव देण्याचे काम हास्ययोग परिवार देत आहे, असे प्रतिपादन महापौर मुक्ता टिळक यांनी केले.
पुणेकरांच्या दिनक्रमात आरोग्यदायी हास्ययोग आणणाऱ्या, विठ्ठल काटे व सुमन काटे यांनी सुरू केलेल्या हास्यक्लब चळवळीला २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आणि नवचैतन्य हास्ययोग परिवार संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित हास्ययोग आनंद मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी डॉ. शां. ब. मुजुमदार, उल्हास पवार, पालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, डॉ. रामचंद्र देखणे, डॉ. संजय उपाध्ये, प्रकाश धोका, डॉ. रमेश गोडबोले, डॉ. मधूसुदन झंवर, डॉ. सुभाष देसाई, डॉ. सतीश देसाई, विकास रूणवाल, विनोद शहा, विजयराव भोसले (उपाध्यक्ष, नवचैतन्य हास्ययोग परिवार संस्था), सचिव पोपटलाल शिंगवी (नवचैतन्य हास्ययोग परिवार संस्था), खजिनदार रामानुजदास मिणियार (नवचैतन्य हास्ययोग परिवार संस्था), समन्वयक मकरंद टिल्लू (नवचैतन्य हास्ययोग परिवार संस्था)आदी उपस्थित होते.याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते ‘हास्यवार्ता’ विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
केवळ ज्येष्ठच नाही तर तरुणपिढी देखील या हास्ययोगामध्ये सहभागी होण्याचा आग्रह धरत आहेत, याचा जास्त आनंद वाटतो, असे देखील टिळक म्हणाल्या.
हास्ययोग क्षेत्रातील योगदानाच्या द्विदशकपूर्तीनिमित्त नवचैतन्य हास्ययोग परिवार संस्थेचे संस्थापक विठ्ठल काटे आणि सुमन काटे यांचा कार्यगौरव सोहळा देखील पार पडला. मान्यवरांच्या हस्ते मानपत्र, शाल देऊन काटे यांचा सन्मान करण्यात आला.
डॉ. शां. ब. मुजूमदार म्हणाले, विठ्ठल काटे हे खऱ्या अर्थाने ’हास्ययोगाचार्य’ आहेत. मी गेली ५५ वर्षे पुण्यात आहे, परंतु मी इतका हसविणारा कार्यक्रम पाहिला नाही. हसणे आणि हसविणे या दोन्ही गोष्टी अनुभवयाला मिळाल्या. पुणे हे गंभीर चेहऱ्याचे शहर म्हटले जाते. या गंभीर चेहऱ्याच्या शहराला विठ्ठल काटे यांनी हसरा चेहरा दिला आहे. हसणे हा योग आहे, एक औषधं आहे हे या हास्ययोग परिवाराने खरे केले आहे. सत्काराला उत्तर देताना काटे म्हणाले, आपण या परिवाराद्वारे एक सशक्त भारत तयार करीत आहोत. राष्ट्रीय एकात्मता खूप मोठी आहे. भारत विविध जाती-धर्माचा देश आहे, या सर्वांना एकत्र बांधून एकत्र घेऊन सुसंवाद साधणे गरजेचे आहे. या करिता हास्ययोग परिवार अधिकाधिक वाढविणे आवश्यक आहे.