बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगणारा सोरतापवाडीत गुन्हे शाखेकडून जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 02:04 PM2017-10-21T14:04:20+5:302017-10-21T14:06:43+5:30
लायसन्स नसताना बेकायदेशीरपणे १ पिस्तुल व त्यामध्ये १० जिवंत राउंड बाळगून फिरणार्या एकास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने जेरबंद केले आहे.
लोणी काळभोर : लक्ष्मीपूजन गुरुवार (१९ आॅक्टोबर) रोजी सोरतापवाडी (ता. हवेली) गावच्या हद्दीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने लायसन्स नसताना बेकायदेशीरपणे १ पिस्तुल व त्यामध्ये १० जिवंत राउंड बाळगून फिरणार्या एकास जेरबंद केले आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी मनोजकुमार अशोक अंकुशे (वय ३२, रा. कुंजीरवाडी, ता. हवेली, जि. पुणे) यास अटक करून लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश क्षीरसागर, सहाय्यक फौजदार दत्तात्रय गिरमकर, दत्तात्रय जगताप, महेश गायकवाड, निलेश कदम, रवी शिनगारे, पोपट गायकवाड, राजू मोमीन यांचे पथक नुकतीच झालेली कदमवाकवस्ती ग्रामपंचायत निवडणूक व दिवाळी सणाचे अनुषंगाने लोणी काळभोर पोलीस ठाणेचे हद्दीत गस्त घालत असताना पोलीस नाईक महेश गायकवाड व निलेश कदम यांना खबºया मार्फत कुंजीरवाडी गावचे पुढे पुणे-सोलापूर रोड लगत सोरतापवाडी गावचे हद्दीत साई आॅटो गॅरेज समोर इसम नामे मनोजकुमार अंकुशे हा आपले जवळ लायसन्स नसताना बेकायदेशीर पणे पिस्तुल बाळगून फिरत आहे, अशी माहिती मिळताच वरील पोलीस पथकाने साई गॅरेज समोर जाऊन पाहिले असता तेथे अंकुशे हा संशयितरित्या उभा असलेला दिसला. पोलिसांना संशय आल्याने तो पळून जाऊ लागला. पोलीस पथकाने पाठलाग करुन त्याला जेरबंद केले. त्याची झडती घेतली असता पॅण्टच्या मागील बाजूस १ पिस्तूल व त्यामध्ये १० जिवंत राउंड मिळून आले. पिस्टलचे लायसन्सबाबत विचारपूस केली असता स्वत:जवळ लायसन्स नसल्याचे सांगितले.
बेकायदेशीर पिस्तुल बाळगले म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. पोलीस नाईक महेश गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे कर्मचारी करीत आहेत.