पुणे-सोलापूर मार्गावर अवैध वाहतूक, अपघाताची शक्यता, पोलिसांचे दुर्लक्ष, वाहतूककोंडीत वाढ, कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 03:13 AM2017-11-28T03:13:07+5:302017-11-28T03:13:15+5:30
पुणे-सोलापूर मार्गावर बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात खासगी वाहनचालकांकडून प्रवाशांची वाहतूक केली जाते. मर्यादेपेक्षा जास्त प्रवाशांना वाहनात बसवले जात आहे.
कोरेगाव मूळ : पुणे-सोलापूर मार्गावर बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात खासगी वाहनचालकांकडून प्रवाशांची वाहतूक केली जाते. मर्यादेपेक्षा जास्त प्रवाशांना वाहनात बसवले जात आहे. याबरोबरच त्यांच्याकडून मनमानी पद्धतीने भाडे आकारले जात आहे. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.
पुणे-सोलापूर मार्गावर प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात जाणे-येणे असते. अनेकदा बस मिळत नसल्याने या प्रवाशांना या खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. या राष्ट्रीय महामार्गावर तीनचाकी रिक्षाने उरुळी कांचन ते हडपसर दरम्यान प्रामुख्याने ही वाहतूक होते. ही वाहतूक करताना वाहतूक नियमांची पायमल्ली या वाहनचालकांकडून केली जात आहे. वाहनांच्या क्षमतेपेक्षाही प्रवाशांना बसविले जाते. तसेच, या मार्गावर वाहतूक नियमांची या चालकांकडून पायमल्ली होत असल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.
कारवाईस टाळाटाळ : प्रवाशांचा जीव धोक्यात
पुणे शहराचा विस्तार होत असताना सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर, उरुळी कांचन या उपनगरांचा प्रचंड विस्तार होत आहे. सध्या या महामार्गावर नेहमीच वाहतूककोंडी होते. सोलापूर महामार्गावर सध्या ४ आसनी वाहनांची संख्या वाढली आहे. यावर महामार्ग पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.
हे बेशिस्त चालक वाहतूक कोंडीलाही कारणीभूत ठरत आहेत. मर्जीप्रमाणे कोणालाही न जुमानता जास्त प्रमाणात वाहतुकीला अडथळा होईल, अशा ठिकाणी ही वाहने उभी केली जात आहे.
हडपसर गाडीतळ येथून जीप, टाटा मॅजिक, मारुती व्हॅन, मारुती इको व पुणे शहरात परवाना नसलेल्या पॅगो रिक्षा, तसेच जिल्ह्याबाहेरील सहाआसनी रिक्षा आदी वाहतुकीचा परवाना नसलेल्या शेकडो वाहनांतून ही वाहतूक निर्धोक सुरू आहे.