नॅकच्या मूल्यांकनात पुणे विद्यापीठातील महाविद्यालयांची छाप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2017 09:45 PM2017-10-30T21:45:56+5:302017-10-30T21:46:14+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न सुमारे ५० महाविद्यालयांंना नॅककडून चांगला दर्जा प्राप्त झाला आहे.
पुणे - नॅशनल असेसमेंट अॅण्ड अॅक्रिडिटेशन कौन्सिल (नॅक) तर्फे मुल्यांकनाचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला आहे. देशभरातील ५२८ विद्यापीठ व महाविद्यालयांनी नॅककडून करून घेतलेल्या मुल्यांकनात महाराष्ट्राच्या १८५ शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे.त्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न सुमारे ५० महाविद्यालयांंना नॅककडून चांगला दर्जा प्राप्त झाला आहे.
नॅक मुल्यांकनाची प्रक्रिया बदलणार असल्याने देशभरातील विद्यापीठ व महाविद्यालयांनी गेल्या काही महिन्यात मुल्यांकन करून घेण्यास घाई केली. त्यामुळे प्रथमत: देशातील तब्बल २५१ शैक्षणिक संस्था नॅक मुल्यांकनास सामो-या गेल्या. त्यातील महाराष्ट्रातील एकूण ७६ शैक्षणिक संस्थांनी पहिल्यांदा नॅककडून मुल्यांकन करून घेतले. राज्यातील ४२ संस्थांनी दुस-यांदा मुल्यांकन करून घेतले . तर तिस-यांदा मुल्यांकन करून घेणा-या राज्यातील शैक्षणिक संस्थांची संख्या ६७ आहे. विद्यापीठाशी संलग्न नाशिक येथील केटीएचएम महाविद्यालयाला नॅक मुल्यांकनात सर्वाधिक (३.७९)गुण मिळाले आहेत.केटीएचएम महाविद्यालयास ‘ए प्लस प्लस ग्रेड ’प्राप्त झाला आहे.
राज्यातील महाविद्यालयांनी नॅक मुल्यांकन करून न घेतल्यास त्यांची संलग्नता रद्द होईल,अशी तरतुद नवीन विद्यापीठ कायद्यात करण्यात आली आहे. तसेच मुल्यांकनाची प्रक्रिया अधिक किचकट होणार असल्याने अनेकांना जुन्याच पध्दतीने मुल्यांकन करून घेणे पसंत केले. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न सुमारे ५० महाविद्यालयांनी नॅककडून मुल्यांकन करून घेतले. त्यात प्रथमच मुल्यांकन करून घेणा-या महाविद्यालयांची संख्या २३ आहे. तर ८ महाविद्यालयांनी दुस-या आणि १८ महाविद्यालयांनी तिस-यांना नॅककडून मुल्यांकन केले.तसेच डी.वाय.पाटील विद्यापीठाच्या काही संस्थांनीही मुल्यांकन करून घेतले.
स.प.,वाडिया ‘ए प्लस’
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात पुण्यातील शिक्षण प्रसारक मंडळीच्या स.प.महाविद्यालयास तिस-यांदा केलेल्या मुल्यांकनात ‘ए प्लस’ ग्रेड प्राप्त झाले आहे.तसेच अनेक वर्षांनंतर दुस-यांदा मुल्यांकन करून घेतलेल्या नौरोसजी वाडिया महाविद्यालयास ‘ए प्लस’ ग्रेड प्राप्त झाला असून महाविद्यालयाचा सीजीपीए 3.51 आहे.
पुण्यातील काही नॅक मुल्यांकन प्राप्त महाविद्यालये
डीईएस नवलमल फिरोदिया लॉ कॉलेज - बी ग्रेड, मराठवाडा मित्र मंडळ इंजिनिअरिंग कॉलेज,कर्वेनगर- ए ग्रेड,एम.एस.काकडे कॉलेज,सोमेश्वरनगर,बारामती- बी प्लस प्लस,कमिन्स महिला इंजिनिअरिंग कॉलेज,कर्वेनगर - ए ग्रेड,महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी- ए ग्रेड, सरस्वती नाईट कॉलेज, पुणे बी ग्रेड,सिंहगड नर्सिंग कॉलेज न-र्हे - बी प्लस प्लस ग्रेड.