भारत माणुसकीत मागासलेला : डॉ. बाबा आढाव : अग्निपुष्प पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 11:58 AM2017-12-28T11:58:56+5:302017-12-28T12:03:27+5:30
देश मागासलेला आहे, अशी खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी व्यक्त केली. अनुबंध प्रकाशन आयोजित व मीनाक्षी कुमकर लिखित अग्निपुष्प पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
पुणे : भारत हा लोकसंख्येच्या दृष्टीने जगात दुसऱ्या स्थानावर आहे. पण वास्तवाचा विचार केला तर माणुसकीच्या बाबत देश मागासलेला आहे, अशी खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी व्यक्त केली.
अनुबंध प्रकाशन आयोजित व मीनाक्षी कुमकर लिखित अग्निपुष्प पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी लेफ्टनंट जनरल माधव तुटकणे आर्म फोर्स मेडिकल कॉलेजच्या मेजर जनरल माधुरी कानिटकर, अनुबंध प्रकाशनच्या अस्मिता कुलकर्णी, कर्नल अरविंद कुशवाह, लेखिका मीनाक्षी कुमकर आदी उपस्थित होते.
आढाव म्हणाले, ‘‘आपल्या मानवी जीवनात माणुसकीचा विचार फारच कमी प्रमाणात केला जात आहे. माणसाने आपले विचार शुद्ध करायला हवेत. तणावातून मार्ग काढले तर मृत्यूला परत पाठवून मानवी जीवनाला जीवनदान मिळू शकते.
कानिटकर म्हणाल्या, ‘‘ या पुस्तकाचे काम चालू असताना मीनाक्षी बरोबर आदिवासी भाग, गोरगरीब लोकांची ठिकाणे फिरले तेव्हाच मला माणुसकीचा खरा अर्थ कळला. प्रत्येक रुग्णाला माणूस म्हणून पाहू लागले.
माधव तुटकणे म्हणाले, आपण नेहमी सत्यमेव जयते म्हणतो पण आताचा भारत सत्तामेव जयते यासंकल्पेनेने चालू आहे. माणसाने माणसाशी माणुसकीने वागावे तर छान होईल आणि हे या पुस्तकातून पाहायला मिळते.
मीनाक्षी कुमकर म्हणाल्या, मी एक समाज कार्यकर्ती आहे या पुस्तकात साहित्यिक गोष्टी नाहीत तर समृद्ध वाचनाला भावणाऱ्या गोष्टी आहेत. हे पुस्तक वाचून मनुष्याला जीवनातील वेदना, व्याधी संपुष्टात आणण्यास मदत होऊ शकते.