भारतीय संगीत घडविते ‘हृदयाचा हृदयाशी संवाद’.. इंग्लंडच्या युवतीचे बोल...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 04:44 PM2017-12-15T16:44:32+5:302017-12-15T16:48:09+5:30
भारतीय अभिजात संगीताचे उत्कट ज्ञान मिळवायचे असेल तर पुण्याच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात जा, असा कुणीतरी तिला सल्ला दिला आणि तिने मागचा पुढचा विचार न करता तडक पुणे गाठले.. सिडनी स्कॅलॉन असे तिचे नाव.
नम्रता फडणीस
पुणे : भारतीय अभिजात संगीताचे उत्कट ज्ञान मिळवायचे असेल तर पुण्याच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात जा, असा कुणीतरी तिला सल्ला दिला आणि तिने मागचा पुढचा विचार न करता तडक पुणे गाठले...पहिल्यांदाच सवाईच्या सप्तसूरांचा हा अनुपम सोहळा अनुभवताना त्या स्वरांशी तिचे एक अनाहूत नाते तयार झाले. ‘हे संगीत इतके अद्भुत आहे की त्यात एक नीरव शांतता आणि पवित्रता अनुभवायला मिळते. भाषा अवगत नसली तरी या संगीतात हदयाचा हदयाशी असा एक विलक्षण संवाद घडतो, असे भावनिक बोल त्या परदेशी युवतीच्या वाणीतून उमटले.
सिडनी स्कॅलॉन असे तिचे नाव. ती मूळची इंग्लंडची. दहा वर्षांपासून अमेरिकेमध्ये ती भारतीय अभिजात संगीताचा अभ्यास करीत असून, ‘डेव्हलपिंग फॉर्म आॅफ म्युझिकल एक्सप्रेशन’ हा तिच्या प्रबंधाचा विषय आहे. विदेशी असूनही सांगीतिक वातावरणाला साजेशा अशा सलवार कमीज च्या भारतीय पहेरावामध्ये ती महोत्सवात सहभागी झाली होती. सूर,लय आणि ताल अशा त्रिवेणी संगमातून साकार झालेल्या या भारतीय अभिजात स्वरसोहळ्याची ती ‘याचि देही याचि डोळा’ प्रथमच साक्षीदार ठरली.. या अनुभवाबद्दल तिने ‘लोकमत’ प्रतिनिधीशी भरभरून संवाद साधला.
ती म्हणाली, सवाईच्या स्वरमंचावर एका कलाकाराचा दुसऱ्या कलाकाराशी गायन आणि वादनाच्या माध्यमातून जो सांगीतिक संवाद होतो तो आमच्याकडे पाहायला मिळत नाही. पाश्चात्य संगीत थोडेसे कर्ण कर्कशतेकडे झुकणारे आहे. पण भारतीय शास्त्रीय संगीतात एक नीरव शांतता आणि पवित्रता आहे. डोळे बंद केल्यानंतर एका ईश्वरीय अनुभूतीची प्रचिती येते. यातच अभिजात संगीतात विविध घराणी पाहायला मिळतात, त्या घराण्यांवर प्रभुत्व मिळविण्यासाठी वर्षानुवर्षे कलाकार रियाज करतात. हे जागतिक संगीतात फारसे आढळत नाही. कलाकाराच्या सादरीकरणामध्ये पाठांतर न दिसता साधनेचा प्रत्यय येतो. पाश्चात्य संगीतातही एकाच कार्यक्रमात गिटार, पियानो, सॅक्सोफोन अशी वाद्ये एकत्रितपणे वाजतात पण त्यांच्यामध्ये अशाप्रकारचे नात तयार होत असल्याचे पाहायला मिळत नाही. मात्र जेव्हा सवाईच्या व्यासपीठावर पाहिल्यांदा जुगलबंदी ऐकली. तेव्हा थक्क झाले. एक कलाकार जे वाजवतो त्याचे शास्त्रशुद्ध पद्धतीने यथायोग्य आकलन करीत दुसरा कलाकार त्याला प्रत्युत्तर देतो ही अनुभूतीच विलक्षण होती. शास्त्रीय संगीतात एकप्रकारची सादगी आहे. आपल्या गुरूला कला समर्पित करणे हा भाव कलाकारांमध्ये पाहायला मिळाला,जे खूप दुर्मीळ असल्याचे तिने सांगितले.