रेल्वेतून पाठविण्यात येणारे सामान ‘रामभरोसे’: नागरिकांच्या तक्रारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2019 08:00 AM2019-05-19T08:00:00+5:302019-05-19T08:00:08+5:30
देशभरात रेल्वेचे जाळे मोठ्या प्रमाणावर पसरले आहे. प्रवासी सेवेबरोबरच सामानाची ने-आण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
फरफट सामानाची भाग १
- राजानंद मोरे-
पुणे : रेल्वेमधून पाठविण्यात येणाऱ्या सामानाचा ठावठिकाणा लावता-लावता नागरिकांच्या नाकीनऊ येत असल्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. नागरिकांना वेळेवर सामान न मिळणे, सामान गहाळ होणे, परत येणे, जादा पैसे घेणे अशा तक्रारी केल्या जात आहेत. सामानाचे ठिकाण कळण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने नागरिकांना थेट रेल्वे स्थानकावरच खेटे घालावे लागत आहेत.
देशभरात रेल्वेचे जाळे मोठ्या प्रमाणावर पसरले आहे. प्रवासी सेवेबरोबरच सामानाची ने-आण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. त्यासाठी रेल्वेकडून सामानाची वाहतुक करण्याचे दर निश्चित करण्यात आले आहेत. दोन ठिकाणांमधील अंतर व सामानाच्या वजनानुसार नागरिकांकडून शुल्क घेतले जाते. पण, नागरिकांनी एकदा हे सामान पार्सल कार्यालयात दिल्यानंतर त्याचा ठावठिकाणा प्रवाशांना समजत नसल्याने अनेकदा गोंधळ उडतो. अनेकदा नियोजित स्थानकावर सामान वेळेवर पोहचत नसल्याचा अनुभव प्रवाशांना येतो. काही नागरिकांचे सामान गहाळ झाल्याच्याही तक्रारी रेल्वेकडे येतात. याबाबत पार्सल कार्यालयाकडूनही योग्य उत्तरे मिळत नसल्याबद्दल नागरिक नाराजी व्यक्त करतात.
कोंढवा येथे राहणारे गौरव सिंग यांचे पार्सलने दरभंगा एक्सप्रेसने दोन फेऱ्या मारल्या आहेत. त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, पुणे-दरभंगा एक्सप्रेसने दि. १ मे रोजी २० किलो वजनाचे एक पार्सल पाठविले होते. मुजफ्फरपुर येथे वडीलांना हे सामान मिळाले नाही. चौकशी केली असता दि. ५ मे रोजी हे पार्सल परत आले होते. पुन्हा दि. ८ मेला पार्सल त्याच गाडीने पाठविले. पुन्हा तोच अनुभव आला. पुणे पार्सल कार्यालयात चौकशी केल्यानंतर मुजफ्फरपुर स्थानकात हे सामान उतरविले गेले नाही, असे सांगितले. दि. १५ मेला पुन्हा त्याच गाडीत सामान पाठविले आहे. आतातरी हे सामान उतरविले आहे किंवा नाही, याबाबत पुणे कार्यालयात चौकशी करावी लागणार आहे. सामानामध्ये देवघर व इतर साहित्य आहे. एवढ्यावेळा चढ-उतार करण्यात आल्याने त्याची मोडतोड झाल्याची शक्यता आहे. हा अनुभव अत्यंत वाईट आहे.
--------------------
सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या अभिषेक गुप्ता यांनी आग्रा येथून दि. ९ मे रोजी दुचाकी पुण्यात पाठविण्यासाठी दिली होती. आग्राहून रेल्वेने पुण्यात येण्यासाठी साधारणपणे २२ ते २४ तास लागतात. पण गुप्ता यांची दुचाकी १६ तारखेपर्यंत पुण्यात आली नाही. पुणे स्थानकावर दुरध्वनीवर विचारले असता माहिती नसल्याचे सांगितले. मग त्यांनी टिष्ट्वटरवर ही माहिती टाकल्यानंतर दि. १६ मे रोजी दुचाकी आग्रा स्थानकातून पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.सुनिता सुराणा यांच्या नावाने उदयपुर येथून दि. ६ मे रोजी २९ किलो वजनाचे घरगुती सामान पार्सल केले होते. पण त्यांना हे पार्सल पुण्यात १३ तारखेपर्यंत मिळाले नाही, त्यामुळे पुण्यातील दक्षा सुराणा यांनी तक्रारही केली. टिष्ट्वटरवरही त्यांनी याची माहिती दिली. पण त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. याबाबत त्यांनी तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे. असे अनुभव प्रवाशांना सातत्याने येत आहेत.
नागरिकांना मिळत नाही माहिती
सामान बुक केल्यानंतर त्याचा ठावठिकाणा नागरिकांना समजावा यासाठी रेल्वेकडे कोणतीही यंत्रणा नाही. नागरिकांना थेट पार्सल कार्यालयात जाऊन चौकशी करावी लागते. सामान नियोजित ठिकाणी पोहचले की नाही याची माहिती मिळत नाही. रेल्वेकडून त्यांच्या सोयीनुसार पार्सल पाठविले जाते. पण ते कधी गाडीत पाठविले, कधी पोहचणार हे कळविले जात नाही. त्यामुळे प्रवाशांना पार्सल कार्यालयात खेटे मारावे लागत आहेत. ही यंत्रणा रेल्वे निर्माण करावी अशी अपेक्षा अभिषेक गुप्ता यांनी व्यक्त केली.