गुंतवणूकदार सर्वोच्च न्यायालयात
By admin | Published: April 24, 2017 05:07 AM2017-04-24T05:07:29+5:302017-04-24T05:07:29+5:30
प्रोग्रेसिव्ह वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून एकत्र येत साडेचार हजार गुंतवणूकदारांनी ‘समृद्ध जीवन’ने केलेल्या आर्थिक फसवणुकीविरोधात सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज दाखल केला.
पुणे : प्रोग्रेसिव्ह वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून एकत्र येत साडेचार हजार गुंतवणूकदारांनी ‘समृद्ध जीवन’ने केलेल्या आर्थिक फसवणुकीविरोधात सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज दाखल केला. त्यामध्ये महेश मोतेवारसह, इतर संचालक आणि केंद्र, राज्य सरकारच्या गृहसचिवांसह विविध खात्याच्या सचिवांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
प्रोग्रेसिव्ह वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने धनेश चट्टे पाटील (वय ४८, रा. उंड्री) यांनी अर्ज दाखल केला. समृद्ध जीवनने केलेल्या अपहाराबाबत तपास करण्यासाठी विशेष पथक नेमावे, या प्रकरणात आतापर्यंत काय तपास केला. त्याबाबतची माहिती द्यावी, सबंध देशात त्या कंपनीविरोधात कुठले-कुठले गुन्हे दाखल आहेत, याची माहिती द्यावी. प्रलंबित असलेल्या केसेसचा तपास करावा, अशी मागणी त्यात आहे.
अद्यापी समृद्ध जीवनची सर्व बँक खाती सील केली गेलेली नाहीत. सर्व खाती सील करावीत, त्यामध्ये किती पैसे आहेत ते जाहीर करावे, ते पैसे गुंतवणूकदारांना परत करावेत, अशा मागण्यांचा समावेश आहे. यावर लवकरच सुनावणी होणार आहे.
(प्रतिनिधी)