पुण्यातील ओमिषा चिट फंडचा गुंतवणूकदारांना लाखोंचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 04:10 AM2017-10-18T04:10:46+5:302017-10-18T04:10:49+5:30
पुणेस्थित संचालकांनी ओमिषा चिटफंड प्रायव्हेट लिमिटेड या नावाने कार्यालय थाटून गुंतवणूकदारांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
नाशिक : पुणेस्थित संचालकांनी ओमिषा चिटफंड प्रायव्हेट लिमिटेड या नावाने कार्यालय थाटून गुंतवणूकदारांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात कंपनीच्या नऊ संचालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
राकेश रमेश खैरनार (२८, रा़ गीता रो-हाउस, भीमाशंकरनगर, पाथर्डी फाटा, नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भारती राजेश राजपूत, जुई संतोष परदेशी, मानसिंग शंकर घोरपडे, दत्तात्रेय महादेव टकले, कैलास परब (सर्व संचालक, रा. पुणे) व मतीन शेख (व्यवस्थापक), विशाल मराठे (वसुली अधिकारी), गणेश जामोदे (प्रशासकीय अधिकारी) व सागर शिरसाठ (लेखाधिकारी) यांनी मुंबई नाका परिसरातील वासन आय केअर नजीकच्या माधव पार्क येथे ओमिषा चिटफंड प्रा. लि. ही कंपनी सुरू केली़ फिर्यादी खैरनार यांनी १ जानेवारी २०१४ ते आॅक्टोबर २०१७ अशी दरमहा २५ हजार रुपये रोख व धनादेशाद्वारे कंपनीत गुंतवणूक केली़ कंपनीतील गुंतवणूक साडेतीन लाख रुपयांपर्यंत पोहचल्याने त्यांनी व्याज तसेच गुंतवणुकीची रक्कम परत मिळावी, यासाठी कंपनीकडे संपर्क साधला़ मात्र, प्रारंभी कार्यालयीन कर्मचाºयांकडून मुदतीच्या नावावर टोलवाटोलवी करण्यात आली़
त्यानंतर खैरनार यांनी संचालकांशी संपर्क साधून पैसे मिळण्याची मागणी केली असता लवकरच तुमचे पैसे मिळतील, असे आश्वासन देण्यात आले़ त्यानंतर एकेदिवशी संचालकांसह कर्मचारी कार्यालय बंद करून फरार झाले़ त्यानंतर खैरनार यांनी पोलिसांत धाव घेतली़
या कंपनीत विविध गुंतवणुकदारांनी गुंतविलेली रक्कम काही कोटींमध्ये असल्याची चर्चा असून फसवूणक झालेल्या तक्रारदारांनी तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे़