रेशनवर लोह अन् आयोडिनयुक्त मीठ; शासनाकडे प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 06:51 AM2018-07-05T06:51:35+5:302018-07-05T06:51:55+5:30
लोह व आयोडिनयुक्त मीठ सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित करण्याचा प्रस्ताव टाटा ट्रस्टद्वारे शासनाकडे सादर केला होता.
पुणे : लोह व आयोडिनयुक्त मीठ सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित करण्याचा प्रस्ताव टाटा ट्रस्टद्वारे शासनाकडे सादर केला होता. त्यास मान्यता मिळाली असूनल पुणे जिल्ह्यातील रेशनकार्डधारकांना टाटा ट्रस्टच्या साहाय्याने प्रायोगिक तत्त्वावर मीठ वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक जुलैपासून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून रेशनकार्डधारकांना १४ रुपये प्रतिकिलो या दराने मीठ मिळणार आहे.
देशात व राज्यात अॅनिमियाचे प्रमाण मोठे आहे. पुरेशा प्रमाणात लोहयुक्त गोळ्या व इतर पोषकद्रव्ये दिल्यास अॅनिमिया नियंत्रणात आणता येते. त्यातच चौथ्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार सहा महिने ते पाच वर्षे वयाच्या राज्यातील ५३.८ टक्के मुलांमध्ये आणि १५ ते ४९ वर्षे वयाच्या महिलांमध्ये ४८ टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात अॅनिमिया असल्याचे दिसून आले आहे. पुरेशा प्रमाणात लोहयुक्त गोळ्या व इतर पोषकद्रव्य दिल्यास अॅनिमिया नियंत्रणात आणता येते. त्याचप्रमाणे सध्या अॅनिमिया नियंत्रणाचा प्रयत्न होत आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून लोह व आयोडिनयुक्त मीठ वितरित करण्याबाबतचा प्रस्ताव टाटा ट्रस्टद्वारे शासनाकडे सादर केला होता. त्यानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत लोह व आयोडिनयुक्त मीठ टाटा ट्रस्टच्या सहकार्याने प्रायोगिक तत्वावर पुणे व नागपूर शहरामधील रेशनकार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानांमार्फत वितरीत केले जाणार आहे. हे मीठ रेशनकार्डधारकांना १४ रुपये प्रति किलो या दराने वितरीत करण्यात येणार आहे.
ग्राहकांना १४ रु. किलो
टाटा ट्रस्ट मार्फत प्राप्त होणारे मीठ साठविण्यासाठी गोदाम उपलब्ध करून देणे, मीठ शासकीय गोदामातून स्वस्त धान्य दुकानदारांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्यावर सोपविण्यात
आली आहे. टाटा ट्रस्टकडून शासनास हे मीठ ११ रुपये प्रति किलो दराने उपलब्ध होणार असून स्वस्त धान्य दुकानदारांना १२ रुपये ५० पैसे प्रति किलो दराने तर रेशनकार्डधारकांना १४ रुपये प्रतिकिलो या दराने मिळणार आहे.