नयनतारा सहगल यांना संमेलनात येऊ न देणे चुकीचे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 02:01 AM2019-01-07T02:01:44+5:302019-01-07T02:02:20+5:30
विनोद तावडे : डॉ. अरुणा ढेरे यांचा सत्कार सोहळा
पुणे : साहित्य संमेलन कुठल्याही वादाशिवाय पार पडले पाहिजे. ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल या संमेलनाला उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी केलेल्या विधानांवरून काही वाद झाला असता तर मी समजू शकलो असतो. परंतु, त्यांना येऊ न देण्याची भूमिका घेणे अत्यंत चुकीचे आहे, अशा शब्दांत राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी मनसेला टोला लगावला.
मुक्तछंद संस्थेतर्फे ‘भेट साहित्य शारदेची’ कार्यक्रमात साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांचा सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर तावडे पत्रकारांशी बोलत होते. आयोजकांनी कुणाच्या तरी दबावाला बळी पडून नयनतारा सहगल या इंग्रजी लेखिकेला संमेलनाला न येण्याचे पत्र पाठविले आहे. या पार्श्वभूमीवर तावडे यांना विचारले असता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कोणत्याही वादविवादापासून दूर राहून झाले पाहिजे. पुरोगामी महाराष्ट्र हा प्रत्येकाला आपली प्रतिभा व्यक्त करण्याची संधी देणारा आहे. नयनतारा सहगल यांनी संमेलनात येऊन भूमिका मांडल्यानंतर त्याला विरोध झाला तर ते समजून घेऊ शकतो. मात्र, त्यांना येऊ न देणे योग्य नाही. साहित्य संमेलनात वाद होऊ नयेत, असे माझे स्पष्ट मत आहे.
शिक्षण सोड अन् नोकरी कर...
४अमरावती येथील एका कार्यक्रमात विद्यार्थ्याने शिक्षण घेणे परवडत नसल्याकडे शिक्षणमंत्री या नात्याने तावडे यांचे लक्ष वेधले होते. मात्र त्यावर ‘शिक्षण सोड आणि नोकरी कर’ असा सल्ला त्यांनी दिला होता.
४’शिक्षण घेणं परवडत नसेल, तर शिक्षण सोड आणि नोकरी कर, असे विधान मी केलेलेच नाही, असे सांगत पत्रकारांवरच गुगली टाकली. तशी एकही ‘क्लिप’ उपलब्ध नाही.
४माध्यमांकडून बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. मी असे काही बोलल्याची क्लिप सादर करा, पोलिसांना विचारा. माहिती न घेता राजकीय कार्यकर्त्याला पिंजऱ्यात उभे करणे हा माध्यमांचा दुरुपयोग आहे, असे तावडे यांनी स्पष्ट केले.
सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीमधील प्राध्यापक आणि व्यवस्थापन यांच्यातील वाद चिघळला आहे. त्यासंदर्भात विचारले असता, कोणत्याही परिस्थितीत सिंहगड इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे नुकसान होणार नाही, याची काळजी आम्ही सरकार म्हणून घेत आहोत, असे सांगून तावडे यांनी वेळ मारून नेली. मात्र, नेमके काय करणार याचे उत्तर देणे टाळले.