समाजमन जाणण्यासाठी सायकलवरून जगभ्रमंती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 04:42 AM2017-12-31T04:42:12+5:302017-12-31T04:42:32+5:30
जगभरातील संस्कृती जाणून घेण्यासाठी ते सायकलवरून जगभ्रमंती करण्यासाठी निघाले आहेत. नुकतेच ते पुण्यात आले असून, त्यांना भारतीय संस्कृती खूप आवडली आहे. समाजमन जाणण्यासाठी मी जगभ्रमंती करीत असल्याचे झेकोस्लोवाकियातील उच्चशिक्षित डॅनियल स्मिथ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
- जयवंत गंधाले
हडपसर : जगभरातील संस्कृती जाणून घेण्यासाठी ते सायकलवरून जगभ्रमंती करण्यासाठी निघाले आहेत. नुकतेच ते पुण्यात आले असून, त्यांना भारतीय संस्कृती खूप आवडली आहे. समाजमन जाणण्यासाठी मी जगभ्रमंती करीत असल्याचे झेकोस्लोवाकियातील उच्चशिक्षित डॅनियल स्मिथ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
डॅनियल स्मिथ सध्या जगभ्रमंती करीत आहेत. सायकलिंग करणारे भारतातील लोक त्यांचा पाहुणचार करीत आहेत. हडपसर येथील डॉ. वैभव दांगड यांच्या घरी ते आले आहेत. दिल्लीहून ते सध्या पुण्यात आले आहेत. त्याच्या या मोहिमेबाबत ‘लोकमत’ने जाणून घेतले.
डॅनियल स्मिथ यांनी बायो फिजिक्स केले असून, त्यानंतर पीएचडी केली. त्यांनी ओस्तावा युनिव्हर्सिटीमधून पीएचडी मिळविल्यानंतर सायकलवरून जगभ्रमंतीला १९ मे २०१७ रोजी सुरुवात केली. आतापर्यंत १२ हजार ५०० किमी प्रवास झाला आहे. झेक प्रजासत्ताक, पोलंड, लुथॅनिया, लॅटेनिया, रशिया, कझाकिस्तान, उझबेकिस्तानमार्गे दिल्ली येथे पोहोचले. त्यानंतर जयपूर, अजमेर, चित्तोडगड, उदयपूर, गांधीनगर, बडोदा, सुरत, दमण, मुंबई, लोणावळामार्गे पुण्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी दाखल झाले आहेत. पुण्यातून हैदराबाद, कोलकाता असा पुढील प्रवास आहे. आणखी एक वर्षांत जपानमध्ये पोहोचण्याचा संकल्प केला आहे.
प्रवासादरम्यान, स्मिथ यांची १७ किलो वजनाची सायकल असून, ५-१० लिटर पाणी, जॅकेट, सायकलचे स्पेअरपार्ट, तंबू, मॅट्रेस असे ४० किलो वजनाचे साहित्य आहे. रशियामध्ये अनेक खेड्यांमध्ये पहिल्यांदाच परदेशी माणूस पोहोचल्याचे आश्चर्याने त्यांनी सांगितले. जगभरातील माहिती इंटरनेटवर मिळते. मात्र, बोहरी, मुस्लिम, ज्यू अशा अल्पसंख्याक समुदायाविषयी त्याला आस्था आहे. त्याच्यावर त्याने अभ्यास करण्याचे ठरवल्याने तो हा जगप्रवास सायकलवरून करीत आहेत.
खेडेगावातील जग पाहायचं आहे
देश-परदेशात सायकलवरून प्रवास करीत असताना तापमानाचा काहीसा परिणाम झाला. उझबेकिस्तानमध्ये मांसाहारी पदार्थांचा काहीसा त्रास झाला. कझाकिस्तानमध्ये निर्मनुष्य जंगलामध्ये प्रवास करीत असताना तंबू टाकून मुक्काम केला. त्या वेळी जंगली घोड्यांचा सहवास त्यांना लाभला असल्याचे सांगून ते म्हणाले, की कुत्रा आणि घोडा हे इमानी आहेत, याची प्रचिती या जंगलामध्ये आली. जंगली प्राण्यांपेक्षा भरधाव वाहनांची जास्त भीती वाटते. उझबेकिस्तान व भारतामध्ये महाराष्टÑ आणि गुजरातमध्ये वाहतुकीच्या नियमांची ऐसीतैशी आहे. उलटपक्षी राजस्थानमध्ये नियम पाळले जात असल्याचे अनुभव आला.
भारतीय जेवणाचा आस्वाद
भारतीय पद्धतीच्या जेवणाचे कौतुक वाटते. बाजरीची भाकरी, पिठलं, पुरणपोळी, बिर्याणीसारखी मेजवानी उत्तम असल्याचे स्मिथ यांनी सांगितले. इतर देशांपेक्षा भारतामध्ये अनेक भाषा, संस्कृती वेगळी आहे, तरीही एकोपा असल्याचे पाहून समाधान वाटत आहे.
मात्र, काही अल्पसंख्याक समुदायाची संस्कृती आणि भाषा लोप पावत असल्याचे पाहायला मिळत आहे. रशियासारखे देश अल्पसंख्याकासाठी भरीव मदत करीत आहेत. रशियामध्ये मूलभूत सुविधा देण्यासाठी प्राधान्य दिले जात असल्याचे पाहून समाधान वाटते आहे, असेही त्यांनी सांगितले.