खेड येथे भाचीची छेड काढल्याप्रकरणी जाब विचारणाऱ्यावर चाकूने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 03:46 PM2018-07-26T15:46:01+5:302018-07-26T15:48:35+5:30
भाचीची छेड काढून त्रास देत असल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या मामांवर चाकुने वार करणाऱ्या रोडरोमिओ व त्याच्या तीन मित्रांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजगुरुनगर : वरुडे ( ता. खेड ) येथील भाचीची छेड काढून त्रास देत असल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या मामांवर चाकुने वार करणाऱ्या रोडरोमिओ व त्याच्या तीन मित्रांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत चाकूने वार व मारहाण केल्यामुळे अक्षय मारूती रणपिसे व गणेश मारूती रणपिसे (रा. गाडकवाडी , ता. खेड ) हे जखमी झाले आहेत. तर नवनाथ रमेश घोडके, कुणाल रविंद्र सोनावणे ( रा. वरुडे ,ता. खेड ) व त्यांचे दोन मित्र (नाव समजू शकले नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना मंगळवारी (दि. २४ ) घडली असून फिर्यादी अक्षय रणपिसे याचा भाऊ दत्ता रणपिसे यांनी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नवनाथ घोडके यांस आमच्या भाचीला त्रास देऊ नको व तिच्या मागे फिरू नको असे समजावून सांगत होता. परंतु, ते समजावून घेण्याऐवजी नवनाथ याने दत्ता यासं रस्त्यांवरील दगड मारुन दुखापत केली तसेच मारहाण केली. सायंकाळी अक्षय याला कामावरून आल्यावर ही घटना समजली. त्यावर अक्षय याने भाऊ गणेश रणपिसे व चुलत भाऊ दत्ता रणपिसे याच्यासमवेत वरूडे येथे नवनाथ घोडके याचे घरी जाऊन त्याचे वडील रमेश घोडके यांना घराबाहेर बोलाऊन झालेला प्रकार सांगितला. त्याचवेळी नवनाथ व त्याच्या तीन साथीदारांनी येऊन अक्षय व गणेश याला शिवीगाळ करुन मारहाण केली तसेच चाकुने वार करून दुखापत केली.
याप्रकरणी खेड पोलिसांत चौघांविरुद्ध बुधवारी (दि. २५) गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी करत आहे.