कोरेगाव भीमा दंगल; चौकशीला तयार असल्याची पत्रे पोलिसांना पाठविली - मिलिंद एकबोटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 06:32 AM2018-02-21T06:32:25+5:302018-02-21T06:32:40+5:30
सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर मिलिंद एकबोटे यांनी ग्रामीण पोलिसांना चार पत्रे पाठवून आपण चौकशीला तयार असल्याचे कळविले होते़
पुणे : सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर मिलिंद एकबोटे यांनी ग्रामीण पोलिसांना चार पत्रे पाठवून आपण चौकशीला तयार असल्याचे कळविले होते़ परंतु, ग्रामीण पोलिसांनी त्यांना कोणताही प्रतिसाद दिला नाही किंवा त्यांना चौकशीलाही बोलविले नाही, असे मिलिंद एकबोटे यांचे वकील महिन प्रधान यांनी सांगितले़ कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला झालेल्या दंगलप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी मिलिंद एकबोटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती़ तेथेही अर्ज फेटाळला गेल्यावर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले़ सर्वोच्च न्यायालयाने ७ फेब्रुवारीला त्यांना अंतरिम जामीन मंजूर करून त्याची सुनावणी २० फेब्रुवारी रोजी ठेवली होती़ मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी अंतिम सुनावणी ४ मार्चला ठेवली असून तोपर्यंत त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे़
याबाबत ज्येष्ठ वकील महिन प्रधान यांनी सांगितले, की ७ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन दिल्यानंतर १२, १३, १४ व १६ फेब्रुवारी रोजी मिलिंद एकबोटे यांनी ग्रामीण पोलिसांना पत्र पाठवून आपण कोणत्याही चौकशीला तयार आहे़ १ जानेवारी रोजी आपण पुण्यातील आपल्या घरीच होतो़ हे आपण सीसीटीव्हीच्या माध्यमातून खात्री करून शकता़ याशिवाय पुणे पोलिसांनी मला २४ तास पोलीस संरक्षण दिले आहे़ त्यांच्याकडे चौकशी करू शकता, असे त्या पत्रात म्हटले आहे़ याशिवाय त्यांनी फोन, मेसेज करून आपण चौकशीला तयार असल्याचे कळविले होते़
अॅड़ प्रधान यांनी सांगितले, की मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या अर्जावर सुनावणी झाली तेव्हा न्यायमूर्तींनी पोलिसांना विचारले,
की तुम्ही त्यांना चौकशीला का बोलावले नाही़ त्यावर राज्य शासनाच्या वतीने वकिलांनी सांगितले की, आम्हाला त्यांना अटक करून पोलीस कोठडी हवी आहे़ त्यावर न्यायालयाने आम्ही अटक करण्याची आॅर्डर दिली आहे़ अटक केल्यानंतर त्यांना जामिनावर सोडण्याचे आदेशात म्हटले आहे़ यावर त्यांच्या वकिलांनी आम्हाला पोलीस कोठडी हवी असल्याचे सांगितले़ तेव्हा न्यायालयाने तुम्ही तपास सोडून कोठडीत घेण्याचे कारण काय?़ तुम्ही तपासावर लक्ष द्या, असे सांगितले़