Koregaon-Bhima Violence : 'तो' मोबाईल नंबर दिग्विजय सिंहांचा; होऊ शकते चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 09:54 AM2018-11-19T09:54:00+5:302018-11-19T10:05:04+5:30
Koregaon-Bhima Violence : कोरेगाव-भीमा हिंसाचाराचा तपास करणाऱ्या पुणे पोलिसांना याप्रकरणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याशीही धागेदोरे निगडीत असल्याचे दिसत आहेत.
पुणे : कोरेगाव-भीमा हिंसाचाराचा तपास करणाऱ्या पुणे पोलिसांना याप्रकरणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याशीही धागेदोरे निगडीत असल्याचे दिसत आहेत. माओवादी संघटनेशी संबंध असल्याचा व त्यांना मदत करण्याबाबतच्या जप्त केलेल्या पत्रातील उल्लेखामुळे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांची पुणे पोलिसांकडून चौकशी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, सध्या अशी चौकशी करण्याचे कोणतेही प्रायोजन नसून वरवरा राव यांना न्यायालयाने दिलेल्या पोलीस कोठडीच्या मुदतीत चौकशी करुन अधिकाधिक पुरावा गोळा करण्याकडे पुणे पोलिसांचे प्राधान्य असल्याचे सह पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
Agar aisa hai, to mujhe sarkaar giraftar kare. Pehle deshdrohi, ab Naxali. Isiliye, yahin se giraftar mujhe karaiye: Congress' Digvijay Singh on BJP's Sambit Patra statement that Singh's phone number has come up in documents found in anti-Naxal raids pic.twitter.com/I6CKGQOz3c
— ANI (@ANI) September 4, 2018
मध्य प्रदेशमध्ये सुरू असलेल्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या या भूमिकेमुळे तेथील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. एल्गार परिषद प्रकरणात पुणे पोलिसांनी बंदी असलेल्या माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन जूनमध्ये नागपुरातील अॅड सुरेंद्र गडलिंग यांच्यासह पाच जणांना अटक करुन त्यांच्याकडील लॅपटॉप व अन्य साहित्य जप्त केले होते. त्यात कॉम्रेड प्रकाश यांनी अॅड. गडलिंग यांना लिहिलेले २५ सप्टेंबर २०१७ रोजीचे एक पत्र पुणे पोलिसांना मिळाले होते. त्यात कॉम्रेड प्रकाश यांनी सांगितले होते की, आपल्या आंदोलनाला काँग्रेस नेते मदत करायला तयार आहेत. त्यासाठी लागणारा निधीही त्यांच्याकडून मिळू शकतो. त्या संबंधात तुम्ही आपल्या काँग्रेस मित्रांशी संपर्क साधावा असे म्हणून त्यात एक मोबाइल क्रमांक दिला होता. हा मोबाइल क्रमांक दिग्विजय सिंह यांचा असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. त्याप्रमाणे दिग्विजय सिंह यांच्याकडे चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
(भीमा-कोरेगाव : 'त्या चिठ्ठीत सापडला दिग्विजय सिंहांचा मोबाईल नंबर')
जूनमध्ये पुणे पोलिसांनी मुंबई, नागपूर, दिल्लीतून सुधीर ढवळे, अॅड. सुरेंद्र गडलिंग, सोमा सेन, रोना विल्सन आणि दीपक राऊत यांना अटक केली होती. यावेळी हे जप्त केलेल्या साहित्यामध्ये कॉम्रेड प्रकाश यांनी अॅड. गडलिंग यांना लिहिलेले हे पत्र पोलिसांना सापडले होते. या कारवाईनंतर दिल्लीत भाजपाचे प्रवक्ते संदिप पात्रा यांनी पत्रकार परिषदेत घेऊन याच पत्राच्या आधारे दिग्विजय सिंह यांचा बंदी असलेल्या माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप केला होता. भाजपाच्या या आरोपावर दिग्विजय सिंह यांनी तातडीने उत्तरही दिले होते. माझा जर माओवाद्यांशी संबंध असेल तर, मला अटक करा असे आव्हान दिले होते.
याबाबत पुण्याचे सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, वरवरा राव यांना शनिवारी अटक केल्यानंतर रविवारी त्यांना पुणे न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने २६ नोव्हेंबरपर्यंत त्याची पोलीस कोठडी दिली आहे़ या पोलीस कोठडीच्या काळात त्यांच्याकडे चौकशी करुन अधिकाधिक पुरावा गोळा करुन तो २६ नोव्हेंबरला न्यायालयाला सादर करायचा व अधिक तपासासाठी आणखी पोलीस कोठडी मिळवायची याकडे पुणे पोलिसांने प्राधान्य असणार आहे. तसेच आनंद तेलतुंबडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेला उत्तर देण्यासाठी पुणे पोलीस त्यासंबंधीचा पुरावा एकत्र करुन तो न्यायालयात सादर करण्याला प्राथमिकता देत आहे. त्यामुळे अशी काही चौकशी करण्याचे अद्याप तरी प्रायोजन नसल्याचे त्यांनी सांगितले.