सव्वा लाखाचे दागिने हातचलाखीने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 05:37 AM2018-05-24T05:37:01+5:302018-05-24T05:37:01+5:30
कोथरूडची घटना : गरिबांना जेवण देण्याचा बहाणा
पुणे : गरीब मुलांना अन्नदान करायचे आहे, असे सांगून मेस चालविणाऱ्या महिलेला लक्ष्मीची पूजा करायची असल्याचे सांगत ताटातील सोन्याची अंगठी, चार बांगड्या असा १ लाख ३२ हजार रुपयांचा ऐवज हातचलाखीने काढून घेऊन फसवणूक करण्याचा प्रकार कोथरूडमध्ये घडला़
याप्रकरणी वंदना कुमार (वय ५३, रा़ पर्वती गाव) यांनी फिर्याद दिली आहे़ कुमार यांचे कोथरूडला पोळीभाजी केंद्र आहे़ त्या पतीसोबत हे केंद्र चालवितात़ मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता एक जण त्यांच्याकडे आला़ त्याने कुमार यांना गरिबांना जेवणदान करायचे आहे, असे सांगून ११० रुपये देऊन जेवणासाठी किती रक्कम होईल, असे विचारले़ त्यावर त्यांनी १६०० रुपये होतील, असे सांगितल्यावर त्याने १६०० रुपये काढून त्यांच्या हातात दिले़ त्यामुळे दोघाही पती-पत्नींचा त्याच्यावर विश्वास बसला़ तेव्हा त्याने एक फडके घेऊन त्यात सर्व नोटा ठेवायला सांगितल्या़ त्यातील एक नोट उचलून वंदना कुमार यांना त्यांच्याकडील अंगठी या नोटेला लावण्यास सांगितले़ त्यानंतर त्यांना चार सोन्याच्या बांगड्या काढून त्या नोटेला लावण्यास सांगितल्या़ आपल्याला लक्ष्मीची पूजा करायची आहे, असे सांगून त्याने त्या नोटा व सोन्याचे दागिने त्या फडक्यात बांधले व ते फडके देवासमोर ठेवायला सांगितले़ त्याप्रमाणे त्यांनी केल्यावर मुलांना घेऊन येतो, असे सांगून तो निघून गेला़ बराच वेळ झाला तरी तो न आल्याने शेवटी त्यांनी फडके उघडून पाहिले असता त्यातील दागिने व नोटा नसल्याचे आढळून आले़ त्यांना बोलण्यात गुंगवून त्याने फडके बांधताना त्यातील दागिने हातचलाखी करून काढून घेऊन त्यांची १ लाख ३२ हजार रुपयांची फसवणूक केली़