सर्वसामान्यांसाठी विधी सेवा मार्गदर्शन मेळावा - एन. एन. पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 03:05 AM2018-01-30T03:05:30+5:302018-01-30T03:05:40+5:30
‘‘न्यायालयामध्ये लोकन्यायालये भरवली जातात, लोकन्यायालयात फक्त पक्षकार येतात, याच्या पुढे जावून उच्च न्यायालयाने कार्यकारी अधिकारी व न्यायव्यवस्था यांनी एकत्र येऊन सर्वसामान्य जनतेसाठी शासकीय व विधी सेवा मार्गदर्शन मेळावा घेण्याचे आदेश दिले. यामध्ये सर्वसामान्य जनतेला कायद्याची माहिती व्हावी, लोकांपर्यंत शासकीय योजना पोहोचाव्यात या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,’’ असे घोडेगाव न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन. एन. पाटील यांनी सांगितले.
घोडेगाव : ‘‘न्यायालयामध्ये लोकन्यायालये भरवली जातात, लोकन्यायालयात फक्त पक्षकार येतात, याच्या पुढे जावून उच्च न्यायालयाने कार्यकारी अधिकारी व न्यायव्यवस्था यांनी एकत्र येऊन सर्वसामान्य जनतेसाठी शासकीय व विधी सेवा मार्गदर्शन मेळावा घेण्याचे आदेश दिले. यामध्ये सर्वसामान्य जनतेला कायद्याची माहिती व्हावी, लोकांपर्यंत शासकीय योजना पोहोचाव्यात या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,’’ असे घोडेगाव न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन. एन. पाटील यांनी सांगितले.
आंबेगाव तालुका विधी सेवा समिती, आंबेगाव तालुका वकील संघटना व आंबेगाव तालुका शासकीय व निमशासकीय कार्यालये यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील नागरिकांसाठी शासकीय व विधी सेवा मार्गदर्शन मेळावा शुक्रवारी घोडेगाव येथील जनता विद्या मंदिरमध्ये घेण्यात आला. या वेळी घोडेगाव न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन. एन. पाटील बोलत होते. याप्रसंगी घोडेगाव न्यायालयाचे न्यायाधीश बी. बी. चव्हाण, न्यायाधीश व्ही. आय. शेख, पंचायत समिती सभापती उषा कानडे, नंदा सोनावले, तहसीलदार रवींद्र सबनिस, एस. जी. टाके, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, दत्तात्रय दराडे, संजय विश्वासराव, आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष अजितशेठ काळे, न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष अॅड.संजय आर्विकर, सचिव अॅड. मुकुंद काळे, उपाध्यक्ष तुकाराम काळे, कार्याध्यक्ष सुरेश काळे, सखाराम पाटील काळे, पंचायत समिती सदस्य अलका घोडेकर, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवती अध्यक्षा अश्विनी पोखरकर उपस्थित होते. यावेळी झालेल्या कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात अॅड. संध्या बाणखेले यांनी महिलांविषयीचे कायदे व डॉ. सारिका कांबळे यांनी महिलांचे आरोग्य याविषयी माहिती दिली. तसेच घोडेगाव ग्रामीण रुग्णालय व पंचायत समिती आरोग्य विभाग यांनी सर्वांनी साठी मोफत अरोग्य शिबिर आयोजीत केले होते. वैद्यकीय अधिक्षीका डॉ.गीता कुलकर्णी व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विक्रम काळे यांनी या शिबीराचे नियोजन केले.
न्यायाधीशांनी दिली इलेक्ट्रॉनिक्सची माहिती
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था घोडेगावच्या मुलांनी इलेक्ट्रॉनिक्ससंदर्भात टेसला कॉईल, डान्सिंग एलईडी, एफएम टान्समीटर हे प्रयोग सादर केले होते. हे प्रयोग पाहताना न्यायाधीश एन. एन. पाटील यांनी मुलांना टेसला कॉईल कसे काम करते, एफएम टान्समीटरमध्ये काय वापरले जाते, कॅपीसिटर म्हणजे काय, असे प्रश्न विचारले. या प्रश्नांची मुलांना व्यवस्थित उत्तरे देता आली नाहीत. मुलांना व्यवस्थित माहिती नसल्याचे दिसताच न्यायाधीश एन.एन.पाटील यांनी प्रयोगाची सर्व तांत्रिक माहिती मुलांनाच दिली. न्यायाधीश पाटील यांचा इलेक्ट्रॉनिक्समधील अभ्यास व ज्ञान पाहून सर्व चकित झाले.