लोहगाव विमानतळावर अजून आकारला जातो १८ टक्के जीएसटी; प्रवाशांना भुर्दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 02:56 PM2017-11-16T14:56:51+5:302017-11-16T15:03:33+5:30
लोहगाव विमानतळावर अजूनही अनेक खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर १८ टक्के जीएसटी लावला जात असल्याचे वास्तव गुरुवारी उघड झाले आहे़ प्रवाशांना अजूनही त्याचा भुर्दंड बसत आहे़
पुणे : खाद्य पदार्थावरील जीएसटीमध्ये कपात करुन केंद्र सरकारने तो ५ टक्के केला आहे़ त्याची अंमलबजावणी १५ नोव्हेंबरपासून देशभर सुरु झाली असली तरी लोहगाव विमानतळावर अजूनही अनेक खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर १८ टक्के जीएसटी लावला जात असल्याचे वास्तव गुरुवारी उघड झाले आहे़ प्रवाशांना अजूनही त्याचा भुर्दंड बसत आहे़
हॉटेल, रेस्टॉरंटमधील खाद्य पदार्थांवर यापूर्वी १८ टक्के जीएसटी लावण्यात आला होता़ त्यावर मोठी टिका होऊन त्याचा फटका हॉटेल व्यवसायावर झाला होता़ शहरातील हॉटेल, रेस्टॉरंटपेक्षा विमानतळावरील दर हे नेहमीच जास्त राहत आले आहे़ त्यात त्यावर १८ टक्के जीएसटी लावला जात असल्याने प्रवाशांना त्याचा मोठा भुदंड बसत असे़ परंतु, दुसरी सोय नसल्याने प्रवाशांपुढे पर्याय नव्हता़ यावर मोठ्या प्रमाणावर टिका झाल्यानंतर केंद्र सरकारने १७७ वस्तूंवरील जीएसटीच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला व त्याची अंमलबजावणी १५ नोव्हेंबरपासून सुरु केली़ असे असताना लोहगाव विमानतळावरील खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर अजूनही १८ टक्के जीएसटी लावला जात असल्याचे गुरुवारी दिसून आले़
याबाबत रोहित रणधीर यांनी सांगितले, की आपले वडिल जयंतराव रणधीर हे गुरुवारी सकाळी लोहगाव विमानतळावर गेले होते़ तेथे त्यांनी कॉफी घेतली़ त्यांच्या बिलात १८ टक्के जीएसटी आकारण्यात आला होता़ त्यांनी विचारणा केली तेव्हा सर्व ठिकाणी १८ टक्के जीएसटी घेतला जात असल्याचे सांगण्यात आले़ त्यांचे विमान लगेच असल्याने ते तक्रार करु शकले नाही़ त्यांनी ही माहिती व बिल आपल्याला पाठविल्याचे रोहित रणधीर यांनी सांगितले़
कारवाई करणार : अजयकुमार
लोहगाव विमानतळावर अजूनही १८ टक्के जीएसटी लावला जात असल्याचे समजले़ त्यांच्यावर आपण कारवाई करु, असे लोहगाव विमानतळाचे संचालक अजयकुमार यांनी सांगितले़
विमानतळावरील खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर अजूनही १८ टक्के जीएसटी लावला जात असल्याचे लोकमत ने त्यांच्या निदर्शनास आणून दिले़
अजयकुमार म्हणाले, जीएसटीतील दरात बदल झाल्यानंतर लोहगाव विमानतळावरील रेस्टॉरंट व खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी १४ नोव्हेंबर रोजी आपण बैठक घेतली होती़ त्यात जीएसटी दरात कपात करण्यात आल्याची माहिती देऊन त्याचा फायदा ग्राहकांना मिळाला पाहिजे, असे सांगण्यात आले होते़ अजूनही तेथे जुनाच दर लावण्यात येत असल्याचे ‘लोकमत’ने निदर्शनास आणून दिले़ ज्यांनी १८ टक्क्यांनी जीएसटी आकारणी केली़ त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, त्याचबरोबर सर्व रेस्टॉरंटची तपासणी करण्यात येणार आहे़