अर्ज भरताना कुणाचे शक्तिप्रदर्शन तर कुणी दिला ‘हम साथ है’चा संदेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 06:41 AM2024-04-19T06:41:24+5:302024-04-19T06:41:32+5:30

बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व नेत्यांनी राजकीय फटकेबाजी केली.  

lok sabha elections 2024 Someone's show of strength while filling the application form, someone gave the message of Hum Saath Hai | अर्ज भरताना कुणाचे शक्तिप्रदर्शन तर कुणी दिला ‘हम साथ है’चा संदेश 

अर्ज भरताना कुणाचे शक्तिप्रदर्शन तर कुणी दिला ‘हम साथ है’चा संदेश 

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: बारामतीकरांनी परिवर्तन करण्याचा निर्धार केला आहे. हा बदल होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आता भाकरी फिरवा. ही लढाई वैयक्तिक नसून, विकासवाद विरुद्ध परिवारवाद अशी आहे, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

सुनेत्रा पवार यांनी अर्ज दाखल केल्यानंतर महायुतीची जाहीर सभा झाली. त्यावेळी शिंदे बोलत होते. ज्यांना लेकीत आणि सुनेत अंतर वाटते, त्यांना मनातल्या मनात मांडे खाऊ द्या. कारण ज्यांच्या मनात मांडे त्यांच्या पदरात धोंडे पडल्याशिवाय राहणार नाहीत, असा टोलाही शिंदे यांनी लगावला.

सूनबाई दिल्लीला जातील : फडणवीस 
सुनेत्रा वहिनींना कोणी थांबवू शकत नाही. सूनबाई दिल्लीला जातील म्हणजे जातील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची आहे. त्यामुळे विकासाला मत द्यायचं की विनाशाला मत द्यायचं, हा सर्वस्वी निर्णय बारामतीकरांचा असणार आहे, असेही फडणवीस म्हणाले.

खोट्याला बळी पडू नका : पवार 
लोकसभेची निवडणूक गावकी आणि भावकीची नाही, तर देशाची आहे. त्यामुळे खोट्या प्रचाराला बळी पडू नका, असे अजित पवार म्हणाले.

राजेंनी बैलगाडीतून येऊन भरला अर्ज 
सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी शक्तिप्रदर्शन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या साक्षीने उमेदवारी अर्ज जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे दाखल केला. गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता बैलांनी सजवलेल्या बैलगाडीत उदयनराजे स्वार झाले आणि रॅली जलमंदिर येथून गांधी मैदानाकडे निघाली. हलगी, नाशिक ढोलचा निनाद करत रॅली गांधी मैदानावर आली. पोवई नाक्यावर आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाहनांचा ताफा त्या ठिकाणी दाखल झाला. त्यांच्यासोबत पालकमंत्री शंभुराज देसाई, होते.  रॅलीत मकरंद पाटील उपस्थित राहणार का, याची उत्सुकता होती. मात्र, तेदेखील सहभागी झाले होते.

प्रणिती शिंदेंकडे ६.५ कोटींची संपत्ती  
सोलापूर  लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांनी गुरुवारी दुपारी शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित हाेते. रॅलीमध्ये पारंपरिक वेशभूषा केलेले लाेक लक्ष वेधून घेत हाेते. श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमानाची वेशभूषा करूनही काही कलावंत सहभागी झाले हाेते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या नावे एकूण ६ कोटी ६० लाख ७० हजार रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्याकडे ३०० ग्रॅम सोन्याचे दागिने असून त्याची किंमत १९ लाख ६६, ५०० रुपये आहे. १ कोटी ६८ लाख ९८ हजार १८० रुपयांची जंगम मालमत्ता असून, ४ कोटी ९१ लाख ७२ हजार २२२ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. 

उन्माद दाखवत आहेत, त्यांना सत्तेबाहेर काढा : शरद पवार 
कोणी विरोध केला की त्याला तुरुंगात टाकले जात आहे. झारखंड, दिल्ली राज्याचे मुख्यमंत्री, पश्चिम बंगालचे मंत्री यांनाही सोडले नाही. लोकशाही उद्ध्वस्त करण्याचा हा प्रकार सुरू आहे. तो थांबवायचा असेल तर त्यांना सत्तेबाहेर काढायला हवे, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर दुपारी रास्तापेठेत जाहीर सभा झाली. त्यावेळी पवार म्हणाले, की आश्वासने द्यायची व ती विसरायची, असे चालले आहे. सत्तेचा उन्माद काय असतो ते केंद्र सरकार दाखवत आहे.

आजीने लढायला शिकवलंय! : सुळे
पक्ष पळवला, चिन्ह पळवलं. नवे चिन्ह मिळाले तर म्हणू लागले, आता ही रडायला लागेल. पण, मी शारदाबाई पवार यांची नात आहे. त्यांनी मला रडायला नाही, तर लढायला शिकविले आहे, अशा तिखट शब्दांत सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला.

पराभवाच्या भीतीनेच फोटोंची जंत्री 
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘भाजपच्या जाहीरनाम्यात मोदी यांचेच ४८ फोटो आहेत. फोटो लावले नाहीत तर लोक आपल्याला विसरतील याची भीती त्यांना आहे. पराभवाची खात्री पटल्यामुळेच ते काहीही करत आहेत.

Web Title: lok sabha elections 2024 Someone's show of strength while filling the application form, someone gave the message of Hum Saath Hai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.