पुणे ते लोणावळा लोकल रद्द, प्रवाशांचे हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2017 10:39 AM2017-12-04T10:39:23+5:302017-12-04T12:35:12+5:30
पुणे ते लोणावळादरम्यान सकाळी 6.30 ते 8.50 वाजेपर्यंतच्या सर्व लोकल रद्द झाल्याने चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला.
पुणे - शिवाजीनगर आणि खडकी रेल्वे स्टेशनच्या दरम्यान सोमवारी सकाळी 6 वाजता सुटणारी लोकल तांत्रिक कारणाने बंद पडली. या खोळंब्यामुळे पुणे ते लोणावळा दरम्यानची रेल्वे वाहतूक सकाळी तब्बल 50 मिनिटे विस्कळीत झाली असल्याची माहिती पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मिलिंद देऊसकर यांनी दिली.
सकाळी सिंहगड एक्सप्रेसच्या आधी 5.55 वाजता पुण्याहून लोणावळ्याला लोकल सुटते. खडकीजवळ त्याच्यात तांत्रिक बिघाड झाल्याने लोणावल्याकडे जाणारी वाहतूक बंद पडली. सुमारे 50 मिनिटांच्या प्रयत्नानंतर ही लोकल खडकी स्टेशनवर आणण्यात यश आले.
त्यानंतर सिंहगड एक्स्प्रेसला सर्व स्टेशनवर थांबा देण्यात आला.
त्याचा परिणाम सिंहगड एक्स्प्रेसला उशीर झाला. सकाळची लोकल लोणावळ्याला जाऊन तोच रेक पुन्हा येत असल्याने लोणावल्याहून सुटणारी लोकल रद्द करावी लागली. प्रवाशांच्या सोयीसाठी इंद्रायणी एक्स्प्रेस सर्व स्टेशनवर थांबवण्यात आली. या सर्व प्रकाराने सकाळीच कामावर जाणारे कामगार, विद्यार्थी यांचे हाल झाले, बहुतेकांना कामावर पोहोचण्यास उशीर झाला.
अचानक उदभवलेल्या या परिस्थितीत सिंहगड व इंद्रायणी एक्स्प्रेस सर्व स्टेशनवर थांबून प्रवाशांची सोय करण्याचा प्रयत्न रेल्वेने केल्याचे मिलिंद देऊसकर यांनी सांगितले.