माधुरी मिसाळ यांनी थांबविली अतिक्रमण कारवाई
By admin | Published: June 1, 2015 05:37 AM2015-06-01T05:37:04+5:302015-06-01T05:37:04+5:30
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने महात्मा फुले मंडईतील अनधिकृत पथारी व हातगाडीवर दोन दिवसांपूर्वी धडक कारवाई केली होती.
पुणे : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने महात्मा फुले मंडईतील अनधिकृत पथारी व हातगाडीवर दोन दिवसांपूर्वी धडक कारवाई केली होती. परंतु, राजकीय वरदहस्त असलेल्या पथारी व्यावसायिकांनी कारवाईला न जुमानता मंडईबाहेर अनधिकृतपणे व्यावसाय सुरू
केला. त्यामुळे महापालिका प्रशासनाने रविवारी सकाळी
पुन्हा कारवाई सुरू केली. मात्र,
काही वेळातच आमदार माधुरी मिसाळ या कार्यकर्त्यांसह तिथे आल्या. अधिकाऱ्यांना बोल सुनावत कारवाई तातडीने थांबविण्यास भाग पाडले. तसेच, आयुक्तांना उद्या (सोमवारी) भेटून तक्रार करणार असल्याचे सुनावले.
गेल्या आठवड्यात शहरातील प्रमुख रस्ते, चौक व भाजी मंडईतील अतिक्रमणांवरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ
झाला होता. सर्वपक्षीय नगरसेवकांनी अतिक्रमणावर कारवाई करीत नसल्याचे आरोप करीत प्रशासनाला धारेवर धरले होते. त्यामुळे चार दिवसांपासून अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विविध भागांत कारवाईचा धडाका सुरू झाला आहे.
महात्मा मंडईत दोन दिवसांपूर्वी प्रशासनाने कारवाई करून अतिक्रमण काढले होते. त्यामुळे मंडई परिसर मोकळा श्वास घेईल, असे वाटत होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी महापालिकेच्या कारवाईला न जुमानता राजकीय वरदहस्त असल्याने बिनदिक्कतपणे मंडईबाहेर पथारी व अनधिकृत विक्री राजरोस सुरू झाली.
दरम्यान, महापालिकेच्या अतिक्रमणे विभागाने रविवारी
सकाळी मंडई परिसरात कारवाई
सुरू केली. मंडईत अधिकृत
गाळे रिकामे असताना
अनधिकृतपणे रस्त्यावर अतिक्रमण करून विक्री करणाऱ्यांवर
सकाळी नऊ वाजता कारवाई सुरू केली. त्यामुळे अनधिकृत विके्रते व पथारी चालकांची धावपळ व फोनाफोनी सुरू झाली. अवघ्या काही मिनिटांमध्ये आमदार मिसाळ कार्यकर्त्यांसह तिथे आल्या. अनधिकृतऐवजी अधिकृत
विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे अधिकार तुम्हाला कोणी दिले, असे त्यांनी सुनावले.
आयुक्त कुणाल कुमार यांना फोन करून त्यांनी कारवाई तातडीने थांबविण्यास सांगितले. तसेच, उद्या भेटून त्याविषयी चर्चा करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण
पथकाला कारवाई न करता परत फिरावे लागले.
त्याविषयी मिसाळ म्हणाल्या, ‘‘गेल्या आठ वर्षांपासून मंडई परिसराचे नूतनीकरणाचे काम
रेंगाळले आहे. अनधिकृत
विक्रेत्यांवर कारवाई करण्यास
आमचा विरोध नाही. मात्र, महापालिकेचे प्रमाणपत्र असलेल्या अधिकृत विक्रेत्यांवर होणारी चुकीची कारवाई थांबविली आहे. आयुक्त कुणाल कुमार यांची याविषयावर उद्या भेट घेणार आहे. ’’
(प्रतिनिधी)