महामेट्रो : स्वारगेट ते कात्रज मार्गाची आज होणार पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 03:33 AM2018-04-07T03:33:09+5:302018-04-07T03:33:09+5:30
महामेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गाच्या स्वारगेट ते कात्रज या विस्तारित मार्गाची शनिवारी सकाळी पाहणी होणार आहे. ड्रोनच्या माध्यमातून तसेच प्रत्यक्ष जमिनीवरूनही ही पाहणी होईल. त्यानंतर त्याचा प्रकल्प अहवाल तयार केला जाईल.
पुणे - महामेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गाच्या स्वारगेट ते कात्रज या विस्तारित मार्गाची शनिवारी सकाळी पाहणी होणार आहे. ड्रोनच्या माध्यमातून तसेच प्रत्यक्ष जमिनीवरूनही ही पाहणी होईल. त्यानंतर त्याचा प्रकल्प अहवाल तयार केला जाईल.
स्वारगेटपर्यंतच येऊन थांबणाऱ्या मेट्रोचा मार्ग थेट कात्रजपर्यंत न्यावा अशी मागणी मेट्रोचे काम सुरू झाले त्या वेळेपासून होत होती. सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाºयांबरोबर बोलून या चर्चेला अंतिम स्वरूप दिले. महापालिकेचे मावळते आयुक्त कुणाल कुमार यांनीही त्यात पुढाकार घेतला. या विस्तारित मार्गाचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचा सर्व खर्च महापालिका करेल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर महामेट्रोनेही या कामाची तयारी सुरू केली आहे.
दरम्यान, शनिवारपासून वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाचे कर्वे रस्त्यावरील काम सुरू होत आहे. प्रत्येकी ३०० मीटर याप्रमाणे काम सुरू होईल. या ३०० मीटरमध्ये साधारण ११ खांब आहेत. पहिले ३०० मीटर यशवंतराव चव्हाण चौकापासून पुढे मोजण्यात आले आहेत. रस्त्याच्या मध्यभागापासून दोन्ही बाजूने पत्र्याचे शेड बांधून मध्यभागी काम सुरू राहील. त्यासाठी या रस्त्यालगत असलेल्या उपरस्त्यांच्या बाजूला वाहने लावण्याची व्यवस्था केली आहे. तसेच या रस्त्याने जाणाºया पीएमपीएल व एसटी महामंडळाच्या वाहनांना दुसºया रस्त्याने वळवण्यात आले आहे, अशी माहिती महामेट्रोच्या वतीने देण्यात आली.
शनिवारी सकाळी यासाठीच्या मार्गाची पाहणी केली जाणार आहे. हवाई व जमिनीवरून अशा दोन्ही प्रकारे मेट्रोचे वरिष्ठ अभियंते ही पाहणी करतील. त्यानंतर या मार्गात येणारे अडथळे, इमारती यांचा अभ्यास करून मार्ग निश्चित केला जाईल. या रस्त्यावरील उड्डाणपुलामुळे बहुतेक हा मार्ग मुकुंदनगरमार्गे जाण्याची शक्यता आहे. मात्र आताच त्याबाबत काहीही सांगता येणार नाही, असे मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाºयांनी स्पष्ट केले.