महाराष्ट्र निवडणूक २०१९ : निकालाआधीच चंद्रकांत पाटील यांना शुभेच्छा देणारे लागले फ्लेक्स
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 08:46 PM2019-10-23T20:46:56+5:302019-10-23T21:00:08+5:30
विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर हाेण्यापूर्वीच पुण्यात विविध उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून शहरात फ्लेक्सबाजी करण्यात आली आहे.
पुणे : कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील यांचा विजय निश्चित मानून भाजपामध्ये नव्याने येऊ केलेल्या काहींनी चंद्रकांत पाटील यांचे बॅनर बाणेर रस्त्यावर लावले आहेत. मुख्य रस्त्यावरील दर्शनी भागामध्ये अन्य कोणाचे बॅनर लागण्यापूर्वीच आपल्या शुभेच्छांचे बॅनर असावेत या घाईत हा प्रकार केला जात असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. तर दुसरीकडे खडकवासला मतदार संघातील भाजपाचे उमेदवार भीमराव तापकीर यांचे मताधिक्क्यही जाहिर करून उत्साही कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली आहे.
कोथरूड विधानसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांचा विजय निश्चित मानला गेल्याने, नुकतेच भाजपात प्रवेश केलेले माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी हे बॅनर बाणेर रस्त्यावरील सोमेश्वरवाडी फाट्यावरील मोक्याच्या व दर्शनी भागावर लावले आहेत. तर खडकवासला मतदार संघात काही कार्यकर्त्यांनी तापकीर यांची एक लाख मताधिक्क्यानी आमदार पदी विजयी झाल्याचे बॅनर लावले आहे़त. दोन दिवसापूर्वी म्हणजे मतदानाच्या दिवशीच निकाल आपल्या बाजूने लागेल अथवा न लागेल, पण विजय निश्चित धरून येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सचिन दोडके यांनी विजयाबद्दलचे बॅनर लावण्यात आले होते. विशेष म्हणजे येथे विजयी मिरवणुकाही काढण्यात आल्याने हा शहरात चर्चेचा विषय बनला होता. त्यालाच उत्तर म्हणून आज भाजप पदाधिकाऱ्यांनीही तापकीर यांचे बॅनर लावल्याचे बोलले जात असले तरी, ही बॅनरबाजी परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.
दुसरीकडे निकालाच्या पूर्व संध्येलाच खुद्द भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या व कोथरूडमधील उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या या बॅनरमुळे बॅनरबाजीच्या व मुख्य रस्त्यावरील फेक्स बळकविण्याच्या चर्चेला उधाण आले आहे.