संवाद साधताना येणारी मुख्य अडचण भाषेचीच : डॉ. सदानंद मोरे; आंतरधर्मीय सुसंवादावर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:14 PM2018-01-31T12:14:16+5:302018-01-31T12:19:23+5:30
जेव्हा आपण आंतरधर्मीय संवादाविषयी म्हणतो तेव्हा एकमेकांना समजून घेताना भाषेचाच अडसर येत असतो. त्यामुळे चांगल्या संवादात भाषेचा अडथळा येतो, असे प्रतिपादन माजी संमेलनाध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
पुणे : ‘‘एका धर्माच्या भाषेत दुसऱ्या धर्माची भाषा व्यक्त करताना ज्या अडचणी येतात त्या समजून घेतल्या पाहिजेत. जेव्हा आपण आंतरधर्मीय संवादाविषयी म्हणतो तेव्हा एकमेकांना समजून घेताना भाषेचाच अडसर येत असतो. त्यामुळे चांगल्या संवादात भाषेचा अडथळा येतो, असे प्रतिपादन माजी संमेलनाध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
मराठवाडा मित्रमंडळ, डायोसिस अॉफ पुणे, मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणि स्वच्छंद यांच्या वतीने आयोजित ‘आंतरधर्मीय सुसंवाद’ या परिसंवादाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी प्रा. डॉ. दत्तात्रय तापकीर, प्रा. डॉ. शमशुद्दीन तांबोळी, प्रा. भाऊसाहेब जाधव, डॉ. थॉमस डाबरे आदी उपस्थित होते.
डॉ. मोरे म्हणाले, की प्रत्येक धर्म हा एका विशिष्ट भाषेत सांगितलेला असतो. धर्म भाषा कितीही वेगवेगळ्या असोत, मात्र ईश्वराचा जो संदेश असतो तो सर्व धर्मांसाठी एकच असतो. ज्या त्या भाषेत जो तो धर्म सांगताना काही एक विशिष्ट कल्पना मांडल्या जातात. एक चौकट तयार केलेली असते आणि त्या चौकटीत बोलावे लागते, मग त्यासाठी तुम्ही कुठलीही भाषा वापरू शकता.
या वेळी सर्वधर्मीय एकतेचा व राष्ट्रभक्तीचा संदेश देणाऱ्या सुमधुर गीतांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये रवींद्र शाळू, आरती आठल्ये, जयंत सबनीस, अनघा धायगुडे यांचा समावेश होता. प्रा. विद्या यंदे यांनी सूत्रसंचालन केले.
डॉ. दत्तात्रय तापकीर म्हणाले, ‘एक दिल के सौ तुकडे कुछ इधर कुछ उधर’ या ओळीमध्ये म्हटल्याप्रमाणे मानवता अशी तुकड्या-तुकड्यांमध्ये विभक्त झाली आहे. आपला समाज हा अंधश्रद्धेमध्ये लोणच्यासारखा मुरलेला आहे.
डॉ. थॉमस डाबरे म्हणाले, राष्ट्र कार्यासाठी या देशातील एकात्मता टिकवण्यासाठी, शांतता राखण्यासाठी आपण प्रजा अंतिम मानून राष्ट्र, सत्ता आणि सरकार प्रजेच्या कल्याणासाठी, प्रजेमध्ये असलेली विभिन्नता लक्षात घेऊन या ठिकाणी जगणे, तसे प्रयत्न करणे असे झाले, तर देशामध्ये शांती-सलोखा टिकून राहील.