कळसकर व अंदुरेसारखे ब्रेनवॉश केलेले अनेक तरुण समाजात : राधाकृष्ण विखे-पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 06:09 PM2018-09-19T18:09:16+5:302018-09-19T18:12:59+5:30
आपण कोणत्या हिंदुत्वाची व्याख्या करतोय. सनातनच्या समर्थनासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला, मग दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि लंकेश हिंदुच होते ना...
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांचे ब्रेनवॉश करण्यात आले होते. त्यांच्यासारखे अनेक तरुण सध्या समाजात आहेत. सनातनसारख्या कट्टरतावादी संस्थांच्या वाढत्या कारवाया घातक असून त्यांच्यावर बंदी घालण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी व्यक्त केले.
पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कै. वि. श्री. जोगळेकर शोधनिबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण विखे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळे ते बोलत होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र बडदे, कार्यवाहक विठ्ठल जाधव, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी आमदार मोहन जोशी, परीक्षक प्रा. प्रकाश पवार, अॅड. अभय छाजेड, पालिकेतील गटनेते आरविंद शिंदे, गोपाळ तिवारी, सदानंद शेट्टी आदी यावेळी उपस्थित होते.
विखे म्हणाले, आपण कोणत्या हिंदुत्वाची व्याख्या करतोय. सनातनच्या समर्थनासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला, मग दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि लंकेश हिंदुच होते ना. सनातनी प्रवृत्ती असलेल्या संस्थांनी आंदोलने केले. त्यातून अंदुरे व कळसकर घडले आहेत. त्यामुळे या संघटनेला ठेचून काढले पाहिजे. मात्र त्यासाठी सरकारची इच्छा शक्ती दिसत नाही. एटीएसने डॉ. दाभोलकर हत्येतील आरोपींना पकडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांचे अभिनंदन देखील केले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री या संघटनांना पाठीशी घालत आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो.
राज्यातील सध्यस्थितीबाबत विखे-पाटील म्हणाले की, पुरेसा पाऊस न झाल्याने राज्यात दुष्काळाची स्थिती आहे. त्यामुळे शेती हा विषय राजकीय नाही तर संशोधनात्मक दृष्टीकोनातून मांडला पाहिजे. कृषी विद्यापीठांकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण होत नसल्याने सर्वसामान्य शेतक-यांपर्यंत काहीच पोहचले नाही. पंतप्रधानांपासून मुख्यमंत्री असे सर्वच शेतक-यांविषयी बोलतात. मात्र, शेतक-यांसाठी आवश्यक असलेल्या कृती होताना दिसत नाहीत. चुकीचे निकष काढून कर्जमाफी करण्यात आली. मराठा आदोलन फोडण्यात सरकारला यश आले आहे.
चंद्रकांत पाटील सर्वार्थाने दादा
सगळ्याच गोष्टींसाठी चंद्रकांत पाटील यांना पाठविले जाते. त्यांना देखील पुढे याचा फायदा होणार याची माहिती असल्याने ते पुढे येतात. त्यामुळे चंद्रकांत पाटील हे सर्वार्थाने दादा आहेत. सरकारने कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला सोशल मीडियाचा चांगला प्रभाव पडला आहे, असे विखे-पाटील म्हणाले.
पत्रकार संरक्षणाचा मुद्दा मांडणार
पत्रकारांचा आवाज दाबण्याचे काम सरकारकडून केले जात आहे. त्यामुळे पत्रकारांना सर्व बाजूंनी संरक्षण आणि सुरक्षिततेचा मुद्दा मी आगामी अधिवेशनात मांडणार असून यासंबंधीचा अहवाल त्वरीत केंद्राला पाठवावा, यासाठी आग्रही राहणार आहे. कितीही इतर माध्यमे आली तरी प्रिंट मीडियाचे महत्त्व कायम राहणार आहे. सरकार कोणाचेही असो माध्यमांमधून वास्तव मांडले जाणे गरजेचे आहे, असे विखे-पाटील म्हणाले.
................