विमानतळाबाबत आज दिल्लीत बैठक, हवाई दलाकडून आक्षेप, संरक्षणमंत्री अध्यक्षस्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 01:34 AM2017-10-24T01:34:39+5:302017-10-24T01:34:41+5:30
पुणे : पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत हवाई दलाकडून उपस्थित करण्यात आलेल्या तांत्रिक आक्षेपांबाबत मंगळवारी (दि. २४) दिल्लीत संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली आहे.
पुणे : पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत हवाई दलाकडून उपस्थित करण्यात आलेल्या तांत्रिक आक्षेपांबाबत मंगळवारी (दि. २४) दिल्लीत संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली आहे.
पुरंदरला विमानतळ झाल्यास लोहगाव आणि नवीन विमानतळाचे सामायिक हवाई क्षेत्र (कॉमन फ्लाईंग एरिया) होईल, असा मुख्य आक्षेप हवाई दलाकडून घेण्यात आला आहे. यानंतर पुरंदर विमातळाची धावपट्टी लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीला समांतर करण्याचे ठरले. मात्र, त्यानंतर पुरंदर विमानतळाच्या धावपट्टीमध्ये पंधरा अंशांपर्यंत कोनीय बदल (अॅन्ग्युलर चेंज) करण्याचे भारतीय विमानतळ प्राधिकरणाने मान्य केले आहे. या सर्व बाबींवर आधारित महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून अहवाल तयार करण्यात आला असून तो संरक्षण विभागाला पाठविण्यात आला आहे. मंगळवारच्या बैठकीत या अहवालावर चर्चा होणार असून त्यामध्ये काही शंका असल्यास त्यांचे निरसन करण्यात येणार आहे.
तांत्रिक समितीच्या लोकांबरोबर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अधिकारी, हवाई दल, भारतीय विमानतळ प्राधिकरण यांचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तांत्रिक अडचणींबाबत संरक्षण विभागाला अहवाल सादर केला आहे. त्या अहवालावर काही प्रश्न उपस्थित झाल्यास त्याबाबतचे स्पष्टीकरण बैठकीमध्ये महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून देण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे आयुक्त सुरेश काकाणे यांनी दिली.
तीन महिन्यांनंतर बैठक
पुरंदर विमातळाबाबत संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत ७ जुलै २०१७ रोजी शेवटची बैठक झाली होती. त्यानंतर आता तीन महिन्यांनंतर बैठक पार पडणार आहे.