मतिमंदांच्या शाळेत आरोग्याची हेळसांड; समितीचा अहवाल, संस्थेतील मुलीवर झाला होता बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 05:08 AM2018-02-04T05:08:11+5:302018-02-04T05:08:24+5:30
शिरुर तालुक्यातील पाबळमधील मतिमंद मुलांच्या निवासी शाळेत मुला-मुलींच्या आरोग्याची काळजीच घेतली जात नव्हती. तसेच, मुलींच्या मासिक पाळीबाबतच्या नोंदी देखील घेतल्याचा जात नसल्याचा अहवाल अपंग कल्याण आयुक्तालयाने नेमलेल्या समितीने दिला आहे.
पुणे : शिरुर तालुक्यातील पाबळमधील मतिमंद मुलांच्या निवासी शाळेत मुला-मुलींच्या आरोग्याची काळजीच घेतली जात नव्हती. तसेच, मुलींच्या मासिक पाळीबाबतच्या नोंदी देखील घेतल्याचा जात नसल्याचा अहवाल अपंग कल्याण आयुक्तालयाने नेमलेल्या समितीने दिला आहे. तसेच संस्थेने बलात्काराचा आरोप असलेल्या कर्मचाºयाच्या निलंबनाचा आदेश पाळला नसल्याचे गंभीर निरीक्षणही त्यात नोंदविण्यात आले आहे.
मुंढव्यातील भटक्या, विमुक्त जाती शिक्षण संस्थेच्या वतीने पाबळ येथील मतीमंद मुलांची निवासी शाळा चालविली जाते. या शाळेतील एका अल्पवयीन मतीमंद मुलीवर शाळेतीलच काळजीवाहक कर्मचाºयाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात २३ डिसेंबर २०१७रोजी रामदास ज्ञानोबा लष्कर याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. सध्या तो अटकेत आहे. यातील अन्य आरोपी मनिषा जाधव या जामीनावर आहेत. या घटनेनंतर अपंग कल्याण आयुक्तालयाने संबंधित शाळेची तपासणी करण्यासाठी चार जणांची समिती नियुक्त केली होती. त्यात गणेश निकाळजे, सुजीत लोखंडे, पंकज वाघमारे आणि राजीव मोरे यांचा समावेश होता.
शाळेमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले असले तरी, त्याचे चित्रण साठविण्याची (बॅकअप) सुविधा देण्यात आलेली नाही.
अधिकारी फिरकलेच नाहीत
पाबळ येथील मतीमंद निवासी शाळेत समाज कल्याण अधिकाºयाने १४ सप्टेंबर २०१२ ते २६ डिसेंबर २०१७ या कालावधीत संबंधित शाळेस भेटच दिली नसल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे. जबाबदार अधिकारी जर शाळेस भेटच देत नसेल तर संबंधित शाळेला अनुदान कसे मंजुर झाले, याची चौकशी करण्याची मागणी प्राहर अपंग क्रांती आंदोलनाच्या सुरेखा ढवळे यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांची तपासणी करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
शाळेतील मुलींच्या मासिक पाळीच्या नोंदी नियमित ठेवल्या जात नाहीत. तसेच, आरोग्य तपासणीत देखील अनियमितता असल्याचे ताशेरे अहवालात ओढण्यात आले आहेत.
तपासणीवेळी शाळेत ३३ मुले हजर होती. त्यात ३१ मुले आणि २ मुली होत्या. या घटनेनंतर पालकांनी १० मुलींना घरी नेल्याची नोंद देखील अहवालात करण्यात आली आहे.