नळस्टॉप चौकात होणार मेट्रो व उड्डाणपूलही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 01:00 AM2017-08-17T01:00:16+5:302017-08-17T01:00:19+5:30
वनाझ ते रामवाडी मेट्रो मार्गावर नळस्टॉप येथे दुमजली उड्डाणपूल तयार करण्यात येणार आहे.
पुणे : वनाझ ते रामवाडी मेट्रो मार्गावर नळस्टॉप येथे दुमजली उड्डाणपूल तयार करण्यात येणार आहे. मेट्रोचा मार्ग व त्याच्या बरोबर खाली हा पूल असेल. त्याचा आराखडा व प्रत्यक्ष बांधकाम करण्याचे काम महामेट्रो कंपनीला देण्यास महापालिकेच्या स्थायी समितीने बुधवारी मंजुरी दिली. या रस्त्यावर सातत्याने होणारी वाहतूककोंडी कमी होण्यास यामुळे मदत होईल.
कर्वे रस्त्याला एकही पर्यायी रस्ता नाही; त्यामुळे या रस्त्यावर कायमच वाहतुकीची कोंडी होते. त्यासाठी उड्डाणपुलाचे काम करणे गरजेचे होते. याच रस्त्यावर लवकरच मेट्रो रेलचे काम सुरू होत आहे. महा मेट्रो हे काम करणार आहे. त्यामुळे त्यांनाच उड्डाणपूल बांधण्याचे काम दिल्यास एकाच वेळी दोन्ही कामे होतील, या उद्देशाने हे काम त्यांना देण्यास मंजुरी देण्यात आली, असे मोहोळ यांनी सांगितले. या प्रकारचे काम त्यांनी नागपूर तसेच जयपूर येथे केले असल्याने त्यांना अशा उड्डाणपुलाचे काम करण्याची माहिती असल्याचे ते म्हणाले.मेट्रोमुळे रस्त्यावरची वाहतूक कमी होणे अपेक्षित आहे; मात्र भविष्यात उड्डाणपुलाची आवश्यकता भासणारच नाही असे नाही. त्यामुळे आताच उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मोहोळ यांनी सांगितले.
>मेट्रो मार्गावर पुलाचा आणि मेट्रो मार्गाचा एकसंध आराखडा तयार करणे, स्ट्रक्चरल डिझाईन यासाठी महामेट्रोबरोबर करार करण्यात येणार आहे. प्रशासकीय स्तरावर आता हे काम करण्यात येईल. पुलाच्या कामाचा सर्व खर्च महापालिका महामेट्रो कंपनीला अदा करेल. अंदाजपत्रकात या वेळी ३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.