मेट्राे मार्गात सापडलेल्या भुयाराची तयार करणार प्रतिकृती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 04:33 PM2019-04-25T16:33:51+5:302019-04-25T16:35:42+5:30
शहराचा इतिहास, निष्कर्ष आणि नाेंदी यांचा अभ्यास केल्यानंंतर हे भुयार बुजवता येऊ शकते असा अहवाल पुरातत्त्व विभागाकडून देण्यात आला आहे. परंतु जेथे भुयार सापडले त्या ठिकाणीच काही अंतरावर भुयाराची प्रतिकृती बनविण्यास सांगण्यात आले आहे.
पुणे : स्वारगेट या ठिकाणी मेट्राेतर्फे मल्टिमाॅडेल ट्रान्सपाेर्ट हब तयार करताना महामेट्राेला ब्रिटीशकालीन भुयार सापडले हाेते. हे भुयार पुणेकरांच्या कुतुहलाचा विषय झाले हाेते. हे भुयार सापडल्यामुळे काहीकाळ मेट्राेचे काम थांबविण्यात आले हाेते. या भुयाराची पाहणी पुरातत्त्व विभागाकडून करण्यात आली असून हे भुयार ब्रिटीशकालीन असल्याचे समाेर आले आहे. 1908 ते 1915 या काळात हे भुयार बांधले गेले असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. शहराचा इतिहास, निष्कर्ष आणि नाेंदी यांचा अभ्यास केल्यानंंतर हे भुयार बुजवता येऊ शकते असा अहवाल पुरातत्त्व विभागाकडून देण्यात आला आहे. परंतु जेथे भुयार सापडले त्या ठिकाणीच काही अंतरावर भुयाराची प्रतिकृती बनविण्यास सांगण्यात आले आहे.
28 मार्च राेजी स्वारगेट येथे महामेट्राेला ब्रिटीशकालीन भुयार सापडले असल्याची बातमी सर्वप्रथम लाेकमतने प्रकाशित केली हाेती. त्यानंतर सर्वच माध्यमांनी याची दखल घेतली हाेती. हे भुयार पुणेकरांच्या चर्चेचा विषय झाले हाेते. हे भुयार सापडल्यामुळे काही काळ मेट्राेचे काम थांबविण्यात आले हाेते. पुरातत्त्व खात्याने या भुयाराचा अभ्यास केला असून त्याचा अहवाल तयार केला आहे. स्वारगेट येथे सापडलेले भुयार हे ब्रिटीशकाळात पाणी पुरवठा करण्यासाठी वापरण्यात येत हाेते. साधारण 1908 ते 1915 या काळात हे वापरण्यात येत असावे. या भुयाराची पाहणी करुन त्याचा अहवाल राज्य सरकारला पाठवण्यात आला आहे. भुयाराचा अभ्यास करताना शहराचा इतिहास, काढलेले काही निष्कर्ष, जुन्या नाेंदी यांचा विचार करण्यात आला. पेशवे काळात कात्रज तलावातून शनिवारवाड्यापर्यंत पाणी आणण्यात आले हाेते. याचा विचार करता हे भुयार फारसे जुने नाही. त्यामुळे मेट्राेचे काम त्याच ठिकाणी असल्याने हे भुयार भुजवण्यास हरकत नसल्याचे पुरातत्व विभागाचे पुणे विभागाचे प्रमुख विलास वहाणे यांनी सांगितले.
दरम्यान असे असले तरी या भुयारातील दगड आणि इतर गाेष्टी वापरुन या भुयाराची प्रतिकृती तयार करण्यास मेट्राेला सांगण्यात आले आहे. जेथे भुयार सापडले त्यापासून काही अंतरावरच ही प्रतिकृती तयार करण्यात येणार आहे. ज्याद्वारे पुणेकरांना या भुयाराची माहिती घेता येणार आहे. लवकरत प्रतिकृती तयार करण्याचे काम सुरु करण्यात येणार असल्याचेही वाहणे यांनी सांगितले.