मिळकत कर सवलतीसाठी महिन्याची मुदतवाढ
By admin | Published: May 24, 2017 04:35 AM2017-05-24T04:35:49+5:302017-05-24T04:35:49+5:30
महापालिकेचा मिळकत कर सवलतीच्या दरात भरण्यासाठी आता पुन्हा एक महिन्याची मुदतवाढ देण्यात येणार आहे. याबाबत मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिकेचा मिळकत कर सवलतीच्या दरात भरण्यासाठी आता पुन्हा एक महिन्याची मुदतवाढ देण्यात येणार आहे. याबाबत मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सवलतीच्या दरात मिळकत कर भरण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. अनेक नागरिकांनी अद्यापही पालिकेचा मिळकत कर भरला नसल्याने त्यांना सवलतीमध्ये हा कर भरता यावा, यासाठी हा प्रस्ताव आयत्यावेळी मांडून दाखल मान्य करण्यात आला.
महापालिकेच्या वतीने ३१ मे पर्यंत मिळकत कर भरणाऱ्या नागरिकांना करामध्ये ५ ते १० टक्के कर सवलत दिली जाते. तर आॅनलाईन मिळकत कर भरणाऱ्यांना दोन टक्के वाढीव सवलतदेखील महापालिकेच्या वतीने दिली जाते. शहरात सुमारे साडेआठ लाख मिळकती असून या सर्वांना पालिकेच्या मिळकत विभागाने बिले पाठविली आहेत. नागरिकांनी आपला कर वेळेत भरावा, यासाठी पालिकेने सवलत जाहीर केली आहे. गेल्या काही वर्षांपासून एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत ही सवलत दिली जाते. या सवलतीचा लाभ घेत बहुतांश नागरिक पहिल्या दोन महिन्यांमध्येच कर भरत असल्याने पालिकेच्या तिजोरीत मोठी रक्कम जमा होते. मागील वर्षी एक महिन्याची वाढीव मुदत नागरिकांना देण्यात आली होती. मात्र यंदाच्या वर्षी ही मुदत दिली जाणार नाही, असे प्रशासनाने जाहीर केले होते.
परंतु, पालिकेच्या मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत आयत्यावेळेस सर्वपक्षीय सभासदांनी मिळकत कर भरण्यास एक महिन्याची मुदतवाढ द्यावी, असा प्रस्ताव मांडला. त्याला बैठकीत मान्यता देण्यात आली.
मंगळवारपर्यंत मिळकत करापोटी ४१० कोटी रुपयांचा महसूल पालिकेकडे भरण्यात आला आहे. सुमारे ४ लाख ६ हजार नागरिकांनी हा मिळकत कर भरला असून यामध्ये १ लाख ८८ हजार नागरिकांनी आॅनलाईन कर भरला आहे.