एमपीएससी परीक्षा : जिद्दीने मिळविले परीक्षेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 07:34 AM2018-05-31T07:34:15+5:302018-05-31T07:34:15+5:30
लहानपणी झालेल्या अपघातामुळे अपंगत्व आले; मात्र शासकीय अधिकारी होण्याच्या इच्छेने सतत अभ्यास करत राहून आदेश
पुणे : लहानपणी झालेल्या अपघातामुळे अपंगत्व आले; मात्र शासकीय अधिकारी होण्याच्या इच्छेने सतत अभ्यास करत राहून आदेश मारुती डफळ याने महाराष्टÑ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले. आदेश राज्यात अपंग विद्यार्थ्यांत प्रथम आला असून तहसीलदारपद त्याला मिळाले आहे.
तो शिरूर तालुक्यातील धामारी येथील शेतकरी कुटुंबातील आहे. आई-वडील दोघेही शेती करतात. मॉडर्न महाविद्यालयात बीएस्सी पदवी घेतल्यावर आदेशने फर्ग्युसन महाविद्यालयातून एमसीएस केले. २०२३ पासून अभ्यासाला सुरुवात केली. मात्र, चार वेळा वेगवेगळ्या परीक्षा देऊनही यश मिळाले नाही. दरम्यानच्या काळात एमपीएससीच्या जागा निघत नसल्याने थोडेसे नैराश्यही आले होते. परंतु, या वर्षी उत्तीर्ण व्हायचेच, या जिद्दीने अभ्यास केला.
आदेशने सांगितले, की कोणताही क्लास लावला नाही. अभ्यासक्रम, ग्रुप डिस्कशन, टेस्ट सिरीज आणि मागील पेपर सोडवून हे यश मिळविले. या परीक्षेत संयम टिकवून ठेवणेच महत्त्वाचे आहे.
तलाठी ते उपशिक्षणाधिकारी
मुळशी तालुक्यातील पौड येथे तलाठी म्हणून कार्यरत असलेले कैलास पिकवणे हे उपशिक्षणाधिकारी झाले आहेत. मागील तीन वर्षांपासून तलाठी म्हणून काम करीत असतानाही त्यांनी एमपीएससीचा अभ्यास सुरू ठेवला. पाचव्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले. ते मूळचे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील आहेत.