मोहरम आणि गणेशोत्सव एकत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 01:15 AM2018-09-21T01:15:22+5:302018-09-21T01:15:44+5:30
बजरंगआळीमधील कुंभार टेकडी तालीम सार्वजनिक ट्रस्टतर्फे तब्बल ११४ वर्षांपासून गणेशोत्सव आणि मोहरम उत्सव एकत्र साजरे केले जातात.
भोर : शहरातील बजरंगआळीमधील कुंभार टेकडी तालीम सार्वजनिक ट्रस्टतर्फे तब्बल ११४ वर्षांपासून गणेशोत्सव आणि मोहरम उत्सव एकत्र साजरे केले जातात. एकाच मंडपात गणपतीची मूर्ती आणि ताबूत बसविण्यात येतात. हिंदु-मुस्लिम ऐक्याचा हा वेगळा नमुना पाहायला मिळत आहे.
बजरंगआळीत कुंभार टेकडी तालीम ट्रस्टने गणेशोत्सव व मोहरम उत्सव सुरू केला. पूर्वीच्या काळी गाव मंडळ म्हणून शहरात प्रसिद्ध होते. त्या वेळी शेटेवाडी, भोईआळी, भेलकेवाडी, वेताळपेठ संपूर्ण शहरातील ज्येष्ठ मंडळ याच ठिकाणी एकत्र येत असत. त्यामुळे एकेकाळी शहरातील नावाजलेले मंडळ होते.
मंडळात पूर्वी पांडुरंग कुंभार, धोंडिबा शेटे, बबन कांबळे, दिनकर पाटणे, बाळासो आलाटे, रमणशेठ शहा या दिग्गजांनी मंडळात अनेक वर्षे काम केले. सध्या मंडळाचे अध्यक्ष विलास कांबळे, उपाध्यक्ष जितेंद्र महाडिक, तर सचिव म्हणून कासमभाई आतार काम पाहत आहेत. मंडळात पूर्वी संपूर्ण मातीची गणेशमूर्ती होती. अनेक वर्षे ही मूर्ती आहे, मात्र काळाच्या ओघात ती जीर्ण झाली. ११४ वर्षांपासून गणेशोत्सव व मोहरम साजरा करण्याची परंपरा कायम आहे.
भोर गणपतीकाळात भोर शहरात सुमारे ४० वर्षांपूर्वी देखावा म्हणून विद्युत रोषणाई (गाण्याच्या तालावर नाचणारी लाईट) कासमभाई आतार यांनी सुरूकेली. ३५ वर्षांपासून गणेश जयंती साजरी करून भोर ते नारायणपूर पायी दिंडीसोहळा साजरा केला जातो.
>ताबूत आणी गणपती एकाच मंडपात एकाच व्यासपीठावर ठेवून दोन्ही धर्माचे लोक एकत्रीतपणे भक्तिभावाने गणेशोत्सव आणी मोहरम साजरा करुन ताबूत आणि गणपती विसर्जन करण्याची १०० वर्षांची परंपरा आजही कायम आहे. यामुळे भोर शहरात हिंदू, मुस्लिम एकत्र नांदत आहेत. कुंभार टेकडी तालीम सार्वजनिक ट्रस्टने एकाच मंडपात ताबूत आणी गणपती बसवला आहे.