‘मुरांबा’ फेम अभिनेत्री, ‘वेब क्वीन’ मिथिला पालकर ‘फोर्ब्स’च्या यादीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 11:48 AM2018-02-09T11:48:45+5:302018-02-09T11:51:57+5:30
‘मुरांबा’ फेम अभिनेत्री मिथिला पालकर हिचे नाव प्रतिष्ठेच्या ‘फोर्ब्स इंडिया’ मासिकाने प्रसिद्ध केलेल्या आशिया खंडाच्या यादीत झळकले आहे.
पुणे : अभिनेता आलोक राजवाडे आणि निपुण धर्माधिकारी यांच्यानंतर आता ‘गर्ल इन द सिटी’ आणि ‘लिटील थिंग्स’ या वेबसिरीजमधील भूमिकांमुळे ‘वेब क्वीन’ म्हणून सर्वांमध्ये सुपरिचित असलेली ‘मुरांबा’ फेम अभिनेत्री मिथिला पालकर हिचे नाव प्रतिष्ठेच्या ‘फोर्ब्स इंडिया’ मासिकाने प्रसिद्ध केलेल्या आशिया खंडाच्या यादीत झळकले आहे.
‘फोर्ब्स इंडिया थर्टी अंडर थर्टी’ अंतर्गत आशिया खंडातील संगीत, क्रीडा, रंगभूमी, ई-कॉमर्स, साहित्य, कायदा, माहिती तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांतील ३० वर्षांखालील युवकांचा या यादीमध्ये अंतर्भाव केला जातो. त्यात आशिया खंडातील आश्वासक ३० युवक-युवतींची यादी तयार करण्यात आली. त्यामध्ये मिथिला या मराठमोळ्या अभिनेत्रीनेही स्थान पटकावले. सर्वप्रथम यूट्यूबवर स्वत:च्या आवाजातील गाणी अपलोड करण्यामुळे ही अभिनेत्री प्रकाशझोतात आली. २०१४ मध्ये मिथिलाने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. ‘माझं हनिमून’ या शॉर्ट फिल्मद्वारे तिने करिअरला सुरुवात केली. १६ व्या मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये ही शॉर्ट फिल्म दाखविण्यात आली. त्यानंतर ‘कट्टी बट्टी’ हा चित्रपट तिने केला. ‘माध्यमातून महाराष्ट्र देशा’साठी तिने गाणेही गायले आहे. अमेय वाघ याच्यासमवेत २०१७ मध्ये ‘मुरांबा’ चित्रपटात ती झळकली.