नळपाणीपुरवठा योजना रेंगाळली
By admin | Published: April 21, 2015 03:03 AM2015-04-21T03:03:41+5:302015-04-21T03:03:41+5:30
राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत राजेगाव (ता. दौंड) येथील नळपाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट पद्धतीने झाले आहे. कामही बरेच दिवस रेंगाळत चाललेले आहे.
राजेगाव : राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत राजेगाव (ता. दौंड) येथील नळपाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट पद्धतीने झाले आहे. कामही बरेच दिवस रेंगाळत चाललेले आहे. योजनेच्या सर्व कामांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी दौंड तालुका भाजपा सरचिटणीस रमेश शितोळे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
राजेगाव (ता. दौंड) गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी ३१ डिसेंबर २0११ रोजी १ कोटी ४९ लाख रुपये खर्चाच्या योजनेच्या कामाला मंजुरी मिळाली होती. ते काम पूर्ण करण्याचा कालावधी एक वर्षाचा होता. परंतु, योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदाराने आजपर्यंत काम पूर्ण केलेले नाही. गावाला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन ४ इंची असून, सदर पाइपलाइन गाडण्यासाठी ४ फुटांपर्यंत खोल चारी खोदणे बंधनकारक होते. तरीसुद्धा ठेकेदाराने १ ते २ फुटांपर्यंतच चारी खोदली आहे. काही ठिकाणी गटारातूनच पाइप टाकल्यामुळे भविष्यात गटाराचे पाणी पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइनमध्ये घुसून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे योजनेच्या कामाची चौकशी करण्याची मागणी राजेगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात ग्रामविकास अधिकारी अजिनाथ पवणे यांच्या मते, गावाजवळील ग्रामपंचायतीची पाण्याची विहीर महिन्यापूर्वी पूर्ण आटल्यामुळे जुनी योजना बंद होऊन पाणी बंद झाले होते. त्यामुळे मागील महिन्यापासून नवीन पाणी योजना सुरू केली आहे. त्यामुळे आता गावाच्या सर्व भागांत पूर्ण दाबाने भरपूर पाणी येत आहे. पाइपलाइनचे पाइप सध्या कोठेही उघडे नाहीत. (वार्ताहर)