वैभवी लवाजम्यासह माऊलींना नीरास्नान
By Admin | Published: June 25, 2017 04:42 AM2017-06-25T04:42:21+5:302017-06-25T04:42:21+5:30
माऊली-माऊली नामाचा जयघोष करीत, टाळ-मृदंगाच्या गजरात नीरा नदीच्या पवित्र तीर्थात आज शनिवारी माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नीरा :
नीरा भीवरा पडता दृष्टि।
स्नान करिता शुद्ध सृष्टी।
अंती तो वैंकुठ प्राप्ती।
ऐसे परमेष्टि बोलिला।।
माऊली-माऊली नामाचा जयघोष करीत, टाळ-मृदंगाच्या गजरात नीरा नदीच्या पवित्र तीर्थात आज शनिवारी माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले. नीरा स्नानानंतर माऊलींच्या पालखी सोहळ्याने आपल्या वैभवी लवाजम्यासह पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन हैबतबाबांच्या जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यातील लोणंद मुक्कामी प्रवेश केला.
रामायणकार वाल्मीकींच्या पुणे जिल्ह्यातील वाल्हे गावचा सकाळी लवकर निरोप घेऊन माऊलींचा पालखी सोहळा नीरानगरीकडे मार्गस्थ झाला. सकाळच्या न्याहरीसाठी पिंपरे खुर्द येथील अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या विहिरींच्या समोर विसावला. पिंपरे खुर्द येथील सरपंच लता थोपटे, उपसरपंच राजेंद्र थोपटे, सोमेश्वर कारखान्याचे संचालक दिलीप थोपटे, राजेंद्र थोपटे यांसह जि. प. शाळेचे व बाबालाल साहेबराव काकडे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले. भाविकांनी भाजी-भाकरीची न्याहारी वारकऱ्यांसाठी आणली होती.
नीरानगरीत माऊलींचा पालखी सोहळा सव्वादहा वाजता दाखल झाला. ग्रामपंचायत कार्यालयासमोरील शिवाजी चौकात पालखी सोहळ्याचे स्वागत सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, सरपंच दिव्या पवार, उपसरपंच बाळासाहेब भोसले, सदस्य अनिल चव्हाण, राजेश चव्हाण, माजी सरपंच चंदरराव धायगुडे, माजी बांधकाम सभापती दत्ताजीराव चव्हाण, लक्ष्मणराव चव्हाण, ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी आदी पदाधिकारी व ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत केले. नीरा पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी नदीकिनारी असलेल्या नयनरम्य पालखीतळावर दर्शनासाठी गर्दी केली होती. पंचक्रोशीतील भाविकांनी रांगा लावून माऊलींच्या पालखीतील पादुकांचे नतमस्तक होऊन दर्शन घेतले. माऊलींच्या स्नानानंतर पालखी सोहळ्याला प्रशासनाच्या वतीने पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेझ हक, अपर पोलीस अधीक्षक (पुणे) तेजस्विनी सातपुते, उपविभागीय पोलीस अधिकारी (भोर-पुरंदर) अशोक भरते, अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, पुरंदरचे तहसीलदार सचिन गिरी, पुरंदर पंचायत समितीचे सभापती अतुल म्हस्के, पुरंदरचे गटविकास अधिकारी डॉ. सचिन काळे आदी पदाधिकाऱ्यांनी निरोप दिला.
ब्रिटिशकालीन पुलावरून पालखी सोहळा जाताना मंद वारा सुटला होता. पैलतीरावर पालखीतील पादुका सोहळ्याचे मालक राजाभाऊ पवार-आरफळकर यांच्याकडे देण्यात आल्या.
आरफळकरांसह प्रमुख विश्वस्त अभय टिळक, रामभाऊ चोपदार, रामभाऊ चौधरी, राहुल चितळकर, अमोल गांधी यांसह सोहळ्यातील मानकऱ्यांनी माऊलींच्या पादुका दत्तघाटावर आणल्या.
‘माऊली माऊली’नामाच्या जयघोषात मोठ्या उत्साहात पादुकांना पवित्र तीर्थात स्नान घालण्यात आले. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी दत्तघाटावर तसेच नदी पुलावर एकच गर्दी केली होती.
माऊलींचा सजवलेला रथ
1 पालखी सोहळ्यातील अर्धा टप्पा पूर्ण झाल्यावर माऊलींचा सोहळा सुरू करणाऱ्या हैबतबाबांची जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यात प्रवेशापूर्वी माऊलींच्या पादुकांना स्नान
घातले जाते. 2 दुपारचे भोजन आणि विसावा घेतल्यानंतर दुपारी एक वाजता सोहळा मार्गस्थ झाला. नीरा नदीवरील जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून सर्वात पुढे मानाचे दोन अश्व, भगव्या पताका व वीणा घेतलेले वारकरी आणि माऊलींचा फुलांनी सजवलेला रथ नीरा स्नानासाठी वैभवी लवाजम्यासह चालत होता.
नियोजित ठिकाणी नीरास्नान न घातल्याने तारांबळ
नीरा नदीच्या दत्तघाटावरील ज्या ठिकाणी परंपरेप्रमाणे माऊलींच्या पादुकांना स्नान घातले जाते. त्या ठिकाणी नदीतच नव्याने सिमेंटचा चौथरा बांधण्यात आला आहे. त्या चौथऱ्यावर नदीचे पाणीच आले नाही. चौथऱ्याच्या पुढे जायचे झाल्यास एकदम पाच फुटांचा खड्डा झाला आहे. त्यामुळे सोहळा मालकांनी ऐनवेळी नियोजित जागी पादुकांना घेऊन न जाता शेजारीच थोड्या अंतरावर माऊलींच्या पादुकांना स्नान घातले. नियोजित जागी माऊलींच्या पादुकांना स्नान न घातल्याने छायाचित्रकार व माध्यमांच्या प्रतिनिधींची एकच तारांबळ उडाली.