तिहेरी तलाक कायद्याचे राजकारण नको; शायरा बानो यांची अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:52 PM2017-10-31T12:52:44+5:302017-10-31T13:00:47+5:30
कुप्रथांमधून बाहेर पडण्यासाठी तिहेरी तलाकचा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्याचे पक्षीय राजकारण होऊ नये, अशी अपेक्षा तिहेरी तलाकविरोधात लढा उभा करणार्या शायरा बानो यांनी व्यक्त केली.
पुणे : तिहेरी तलाकसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे मुस्लिम महिलांवरील अन्याय, अत्याचार, शोषणाला आळा बसू शकेल. कुप्रथांमधून बाहेर पडण्यासाठी, तसेच नवीन पिढीच्या विकासासाठी तिहेरी तलाकचा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे कायद्याचे राजकीय भांडवल करून त्याचे पक्षीय राजकारण होऊ नये, अशी अपेक्षा तिहेरी तलाकविरोधात लढा उभा करणार्या शायरा बानो यांनी व्यक्त केली.
मुस्लिम सत्यशोधक मंडळातर्फे आयोजित वार्तालापात बानो यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी, बानो यांचे बंधू अर्शद अली, शकील अहमद हेदेखील उपस्थित होते.
बानो म्हणाल्या, ‘तिहेरी तलाकविरोधात न्यायालयात अर्ज केल्यानंतर विविध संघटना, तसेच कुटुंबांचा पाठिंबा मिळाला. मात्र मुस्लिम बोर्ड, स्थानिक मौलवी यांच्यासह अनेक प्रतिगामी संघटनांकडून प्रचंड दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांनी प्रत्यक्ष भेटून, फोन करून अनेकदा याचिका मागे घेण्यासाठी धमकीवजा विनंती केली. त्यामुळे न्यायालयीन लढ्यात मोठा संघर्ष करावा लागला.’ याचवेळी अनेक महिला संघटनांनी मदत केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. अनेकदा सुशिक्षित मुस्लिम कुटुंबात तिहेरी तलाक दिला जात नाही. त्यामुळे तेथील महिलांना या कुप्रथेची तितकीशी जाणीव नसते. परंतु, हे दु:ख भोगाव्या लागणार्या महिलेची परिस्थिती बिकट असते.
बानो यांचे बंधू अर्शद अली म्हणाले, ‘तिहेरी तलाकनंतर बहिणीने खूप त्रास सहन केला. सुरुवातीचा दीड महिना तिने एका शब्दानेही वाच्यताही केली नाही. मात्र, तिने याबाबत सांगितल्यानंतर न्यायालयीन लढा देण्याचा आम्ही निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत कायदा करण्यासाठी सरकारला दिलेल्या कालावधीतील दोन महिने संपले असून कायद्यात नेमके काय अपेक्षित होते, याविषयीची आमच्याकडे विचारणा केली नसल्याचे ते म्हणाले.
मुस्लिम समाजात महिला अनेक वर्षांपासून अन्याय, अत्याचार, शोषण सहन करत आल्या आहेत. न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर समाजातील प्रथांमध्ये बदल होण्याची आशा निर्माण झाली आहे. मात्र, न्यायालयाचा निकाल सहजासहजी स्वीकारण्याची मानसिकता अद्याप तयार झालेली नाही. मानसिकता बदलण्यासाठी जनजागृती होण्याची गरज आहे.
- शायरा बानो
----------