डीजे बंदीविरोधात गणेश मंडळे आक्रमक : विसर्जन मिरवणुकीत सहभागी न होण्याचा पावित्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 03:12 PM2018-09-22T15:12:34+5:302018-09-22T15:22:57+5:30
न्यायालयामध्ये डीजेविषयीची भूमिका मांडण्यात सरकार कमी पडले आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत डीजेवरची बंदी कायम ठेवण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाने गणेशोत्सव , मंडळे आणि डीजे व्यवसाय अशा सर्वांचीच अडचण झाली आहे.
पुणे : न्यायालयामध्ये डीजेविषयीची भूमिका मांडण्यात सरकार कमी पडले आहे. त्यामुळे या विसर्जन मिरवणुकीत डीजेवरची बंदी कायम ठेवण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाने गणेशोत्सव , मंडळे आणि डीजे व्यवसाय अशा सर्वांचीच अडचण झाली आहे. त्यामुळे डीजेवर बंदी आणल्याने गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी न होता गणपतीची मूर्ती मंडपातच ठेवणार असल्याचा निर्णय शहरातील गणेश मंडळांनी घेतला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने डीजेवर बंदी घातल्याने राज्यातील गणेश मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजीचे वातावरण आहे.या निर्णयाविरोधात पुण्यातील गणेश मंडळ आणि डीजे मालकाची आज पुण्यात बैठक झाली. या बैठकीत शहरातील ९० मंडळांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. शिवसेना नगरसेवक विशाल धनवडे म्हणाले की, न्यायालयामध्ये डीजे विषयी भूमिका मांडण्यात सरकार कमी पडले आहे.त्यामुळे या विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवले जाणार नाही.या न्यायालयाच्या या निर्णयाने इतकी वर्ष जगाच्या पाठीवर पुण्याच्या गणेशोत्सवाने नाव उंचावले आहे. परंतु, आता न्यायालयाच्या निर्णयामुळे पुण्यासह राज्यातील मंडळात नाराजीचा सूर उमटला आहे. तसेच या निर्णयामुळे संपूर्ण उत्सव अडचणी आला असून डीजेवर बंदी आणल्याने गणपतीची मूर्ती मंडपात ठेवण्याचा निर्णय शहरातील सर्व मंडळांनी एकत्रित येवून घेतला आहे. मात्र, डीजेविषयी व न्यायालयाच्या निर्णयाप्रती मुख्यमंत्र्यानी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, हिंदू सणांच्या वेळीच सरकारला बंदीची आठवण होते. मुख्यमंत्र्यांनी अधिकार वापरून बंदी उठविण्यास पुढाकार घ्यावा. अन्यथा आगामी निवडणुकांमध्ये भाजपा पक्षाचे विसर्जन करण्यात येईल. तसेच पोलीस आणि मंडळांमध्ये संघर्ष निर्माण करण्याचा सरकारचा हेतू असल्याचा आरोप यावेळी काही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केला. मात्र, हा गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी खासदार, आमदार यांना संपर्क साधून डीजेवरील बंदी उठविण्याबाबात विनंती करणार आहोत.