भांडारकर संस्थेला नोटीस, अनुदानावर व्याज घेत असल्याचाही ठपका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 05:27 AM2017-12-18T05:27:02+5:302017-12-18T05:27:11+5:30
वयाची शंभरी पार करीत असलेल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेला राज्य सरकारच्या शिक्षण संचालनालयाने (उच्च शिक्षण) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कर्मचारी भरतीमध्ये सरकारचे नियम पाळले नाहीत याबाबत विचारणा करण्यात आली असून केंद्र सरकारने दिलेल्या ५ कोटी रुपये अनुदानाचा उद्दीष्टासाठी वापर न करता ते पैसे बँकेत ठेवून व्याज प्राप्त करीत असल्याचा ठपकाही संचालनालयाने संस्थेवर ठेवला आहे.
पुणे : वयाची शंभरी पार करीत असलेल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेला राज्य सरकारच्या शिक्षण संचालनालयाने (उच्च शिक्षण) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कर्मचारी भरतीमध्ये सरकारचे नियम पाळले नाहीत याबाबत विचारणा करण्यात आली असून केंद्र सरकारने दिलेल्या ५ कोटी रुपये अनुदानाचा उद्दीष्टासाठी वापर न करता ते पैसे बँकेत ठेवून व्याज प्राप्त करीत असल्याचा ठपकाही संचालनालयाने संस्थेवर ठेवला आहे.
संस्थेला केंद्र सरकारने सन २००७ मध्ये केंद्रीय अंदाजपत्रकात तरतूद करून ५ कोटी रुपयांचे अनुदान दिले. हे अनुदान संस्थेमध्ये नवे सभागृह तसेच वसतीगृह बांधण्यासाठी दिले होते. संस्थेने मात्र काही जुन्या वास्तुंचे नूतनीकरण केले व अनुदानाचे पैसे बँकेत ठेवले. त्यावर संचालनालयाच्या पत्रात ठपका ठेवण्यात आला आहे. केंद्र सरकारची ही रक्कम संबधीत उद्दीष्टांसाठी खर्च न करता बँकेत ठेवून त्यावर व्याज मिळवले जात आहे, असे संस्थेच्याच सन २०१४-२०१५ च्या ताळेबंद पत्रकावून दिसत असल्याचे पत्रात ठळकपणे नमूद करण्यात आले आहे.
संस्थेच्या या अनियमीत बाबींसाठी संस्थेवर प्रशासक नियुक्त करावा अशी शिफारस धर्मादाय आयुक्तांना करण्याबाबत राज्य सरकारला का कळवण्यात येऊ नये, याबाबत खुलासा करावा असे संचालनालयाने म्हटले आहे. त्याचबरोबर संस्थेतील कर्मचारी भरतीबाबतही विचारणा करण्यात आली आहे. राज्य मागासवर्गीय शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी हितकारिणी संघटनेने याबाबत संचालनालयाकडे तक्रार केली
होती. संस्थेच्या नियामक मंडळाने संस्थेत एकूण ४६ पदे मान्य केली आहेत. मात्र संस्थेमध्ये २० पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत नाहीत, ही बाब अयोग्य आहे.