मुठा कालव्यालगत केबल टाकणा-या कंपन्यांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 03:52 PM2018-10-03T15:52:54+5:302018-10-03T15:58:13+5:30
जलसंपदा विभागाच्या हद्दीत केबल्स टाकण्यापूर्वी परवानगी घेणे आवश्यक आहे. जलसंपदा विभागातर्फे कालव्याच्या दुरुस्तीचे काम करताना काही केबल्स निदर्शनास आल्या आहेत...
पुणे : दांडेकर पुलाजवळ घडलेल्या दुर्घटनेच्या ठिकाणी मुठा कालव्यालगत काही खासगी कंपन्यांच्या केबल्स आढळून आल्या आहेत. जलसंपदा विभागाची परवानगी न घेता या केबल्स अनधिकृतपणे टाकण्यात आल्या असल्याने संबंधित कंपन्यांना नोटिसा बजाविल्या आहेत. या ठिकाणी महावितरणच्या केबल्स असून त्यांचे स्थलांतर केले जात आहे.
जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता ता. ना. मुंडे म्हणाले, जलसंपदा विभागाच्या हद्दीत केबल्स टाकण्यापूर्वी परवानगी घेणे आवश्यक आहे. जलसंपदा विभागातर्फे कालव्याच्या दुरुस्तीचे काम करताना काही केबल्स निदर्शनास आल्या आहेत. या केबल्स खासगी कंपन्यांच्या असून त्यांनी परवानगी न घेता केबल्स टाकल्याने त्या तोडून आल्या आहेत. या केबल्स कोणत्या कंपन्यांच्या आहेत यांचा शोध घेऊन संबंधित कंपन्यांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे कालव्या जवळून महावितरणच्या केबलसुध्दा टाकण्यात आल्या आहेत.त्यातून वीज पुरवठा सुरू आहे.त्यामुळे महावितरणकडे याबाबत विचारणा करण्यात आली आहे.
दरम्यान, महावितरणने परवानगी घेऊन वीजवाहिन्या टाकल्या आहेत,असे महावितरणने स्पष्ट केले आहे. कालव्याच्या बाहेरील बाजूला पाच फूट अंतरावर महावितरणच्या २२ केव्ही क्षमतेच्या दोन भूमिगत वीजवाहिन्यांच्या चार केबल्स आहेत. या भूमिगत वीजवाहिन्यांच्या कामासाठी जलसंपदा विभागाकडे २०१६ मध्ये परवानगी घेण्यात आली; तसेच आवश्यक शुल्काचा भरणा केल्यानंतर जलसंपदा विभागाच्या देखरेखीखाली आणि दोन्ही वीजवाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत.वीज वहिन्या टाकण्यासाठी करण्यात आलेली खोदाई ही कालव्याच्या बाहेरील भिंतीपासून पाच फूट अंतरावर आहे. आता या वीजवाहिन्या स्थलांतरित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
.................
कालव्याच्या भिंतीवर मातीचा थर आहे. कालव्यालगतची माती खोदून जलसंपदा विभागाची परवानगी न घेता खासगी कंपन्यांनी येथे केबल्स टाकल्या आहेत. या आॅप्टिक फायबर केबल्स असून, त्या कोणत्या कंपन्यांच्या आहेत, हे जलसंपदा विभागाच्या लक्षात येत नव्हते. तसेच संबंधित कंपन्या पुढे येत नव्हत्या. त्यामुळे या केबल्स तोडण्यात आल्या. केबल्स तोडल्यावर संबंधित कंपन्यांकडे ग्राहकांच्या तक्रारी आल्या. त्यानंतर संबंधित कंपन्यांचा शोध लागला.आता कंपन्यांची माहिती संकलित करण्यात आली असून, त्यांच्याविरूद्ध कारवाई केली जात आहे,असेही मुंडे यांनी सांगितले.