ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयात लाच घेताना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 03:56 PM2018-03-14T15:56:17+5:302018-03-14T15:56:17+5:30
आरोग्य निरीक्षक,वैद्यकीय अधिकारी जाळ्यात : डॉक्टरांची तक्रार
पुणे : हॉस्पिटलच्या नोंदणी परवाना नुतनीकरणासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना पुणे महापालिकेच्या ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य निरीक्षक व वैद्यकीय अधिकाऱ्यास सापळा रचून पकडण्यात आले़.आरोग्य निरीक्षक मधुकर निवृत्ती पाटील (वय ५३) आणि वैद्यकीय अधिकारी डॉ़ संदीप जयराम धेंडे (वय.४०) अशी त्यांची नावे आहेत़.
याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे एका डॉक्टरांनी तक्रार दिली होती़. त्यांचे हॉस्पिटल आहे़. त्यांनी हॉस्पिटलचा नोंदणी परवाना नुतनीकरणासाठी पुणे महापालिकेकडे ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज केला होता़. हे प्रकरण ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाकडे होते़. मधुकर पाटील व डॉ़ धेंडे यांनी त्यांना हॉस्पिटलचा नोंदणी परवाना नुतनीकरणासाठी १० हजार रुपयांची लाच मागितली़. या डॉक्टरांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर त्याची पडताळणी करण्यात आली़. त्यानंतर मंगळवारी ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयात सापळा रचून १० हजार रुपयांची लाच घेताना दोघांना पकडण्यात आले़.बंडगार्डन पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़