पुणेकरांनीच ठेवायचंय शहराला सुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 06:51 AM2017-10-04T06:51:23+5:302017-10-04T06:52:05+5:30
विविध उपक्रमांच्या माध्यमातून पुण्याला सुरक्षित ठेवण्यासाठी पावले उचलण्यात आली असली, तरी सर्वांनी एकत्र आल्याशिवाय पुणे सुरक्षित होणार नाही.
पुणे : विविध उपक्रमांच्या माध्यमातून पुण्याला सुरक्षित ठेवण्यासाठी पावले उचलण्यात आली असली, तरी सर्वांनी एकत्र आल्याशिवाय पुणे सुरक्षित होणार नाही. आपल्या डोळ्यांसमोर एखादा गुन्हा घडत असेल तर त्या गुन्ह्याला पाठीशी घालणार नाही, असा निर्धार पुणेकरांनी केला पाहिजे. कारण, आता पुणेकरांनीच पुण्याला सुरक्षित ठेवण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी केले.
सध्या शहरातील नागरिकांसह महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी पुणे पोलिसांकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यामध्ये पोलीसकाका, बडी कॉप आणि सिटीसेफ यांचा समावेश असून, या उपक्रमांबाबत समाजामध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने पुणे पोलिसांच्या वतीने ‘वुई मेक पुणे सिटी सेफ’ या अभियनांतर्गत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. ‘लोकमत’ या रॅलीचा माध्यम प्रायोजक आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम, अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, वेंंकीज इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक जगदीश बालाजी राव, व्हील पूनावाला फाउंडेशनच्या नताशा पूनावाला, फिनोलेक्सचे संचालक अनिल बाबी आणि प्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल उपस्थित होते.
रश्मी शुक्ला यांनी तिन्ही उपक्रमांची संक्षिप्तपणे माहिती देत, पुणे पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पावले उचलली आहेत; मात्र पुण्याला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ही पुणेकरांची देखील आहे, याकडे लक्ष वेधले. शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयावरून दुपारी ४ वाजता या रॅलीला पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या हस्ते झेंडा दाखवून प्रारंभ झाला. या रॅलीमध्ये वाहतूक पोलीस, वाहतूक मार्शल, बीट मार्शल, महिला मार्शल आदी विविध विभागांतील जवळपास ३२0 पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.
पोलीस मुख्यालयपासून वीर चाफेकर चौक, यू टर्न घेऊन सिमला आॅफिस चौक, संचेती चौक, उजवीकडे वळून स. गो. बर्वे चौक, सरळ जे. एम. रस्त्याने मॉडर्न कॉलेज चौक, झाशीची राणी चौक, नटराज चौक, गरवारे पुलावरून गुडलक चौक, एफ.सी रोडने फर्ग्युसन कॉलेज गेट, तुकाराम पादुका चौक, ज्ञानेश्वर पादुका चौक, ललित महल चौक, वीर चाफेकर चौक, उजवीकडे वळून सिमला आॅफिस चौक, संचेती चौक, डावीकडे वळून इंजिनिअर कॉलेज चौक, सरळ संगम पुलावरून आरटीओ चौक, जहांगीर हॉस्पिटल चौक, रेसिडन्सी क्लब, कौन्सिल हॉल चौक, पूना क्लब, ब्लू नाईल चौक, इस्कॉन मंदिर, डॉ. आंबेडकर पुतळा, बॉम्बे गॅरेज चौक, उजवीकडे वळून महावीर चौक, पु. ना. गाडगीळ, एम. जी. रस्त्याने अरोरा टॉवर चौक, नेहरू मेमोरिअल हॉल चौक या मार्गाने बी.जे मेडिकल मैदानावर समाप्ती झाली.
गेल्या काही वर्षांमध्ये वाहतुकीचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांकडून पोलिसांना मारहाण करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पोलिसांवर हात उचलणाºया वाहनचालकांवर आता आयपीसी ३५३ अंतर्गत कारवाई होऊ शकते. त्यामुळे खबरदार! वाहनचालकांवर दंडात्मक तसेच शिक्षा, सरकारी नोकरी न मिळणे आणि पासपोर्ट मिळण्यास अडचणी येणे, गुन्हा दाखल झाल्यामुळे बाहेरदेशी जाण्यास अडचणी येणे अशा स्वरूपाची कारवाई होऊ शकते, हे दर्शविणारा व्हिडिओ पुणे पोलिसांकडून करण्यात आला आहे. त्याचे सादरीकरण करण्यात आले.