पुणे नाट्यसत्ताक महोत्सवातून ‘दर्दी’ नाट्यरसिकांना सर्वोत्तम नाटके पाहण्याची मिळणार संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:34 PM2018-01-11T12:34:45+5:302018-01-11T12:37:32+5:30
वाईड विंग्ज मीडियाच्या वतीने दि. १२ ते १४ आणि दि. १९ ते २१ जानेवारी अशा दोन टप्प्यांत पुणे नाट्यसत्ताक महोत्सव रंगणार आहे. महोत्सवाचे यंदाचे हे सलग तिसरे वर्ष आहे.
पुणे : पुण्यातील ‘दर्दी’ नाट्यरसिकांना एकाच छताखाली सर्वोत्तम नाटके पाहण्याची संधी मिळणार आहे, ती पुणे नाट्यसत्ताक महोत्सवाच्या माध्यमातून. वाईड विंग्ज मीडियाच्या वतीने दि. १२ ते १४ आणि दि. १९ ते २१ जानेवारी अशा दोन टप्प्यांत हा महोत्सव रंगणार आहे. महोत्सवाचे यंदाचे हे सलग तिसरे वर्ष आहे. ‘नाट्यसत्ताक रजनी’ हा संपूर्ण रात्रभर चालणारा पुण्यातील पहिलावहिला नाटकांचा जागर हे महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. हा नाट्यसत्ताक रजनीचा कार्यक्रम दि. २५ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता सुरू होऊन दि. २६ जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजता संपेल.
या महोत्सवात २७ संस्थांची २९ सादरीकरणे ५ नाट्यगृहात होणार आहेत. त्यामध्ये सुदर्शन रंगमंच, ज्योत्स्ना भोळे सभागृह, भरत नाट्य मंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह व बालगंधर्व रंगमंदिर यांचा समावेश आहे.
ज्येष्ठ रंगकर्मी प्रदीप वैद्य यांचे दोन अंकी नाटक काजव्यांचा गावच्या सादरीकरणाने महोत्सवाची सुरुवात होईल, तर निरंजन पेडणेकर या तरुण प्रयोगशील रंगकर्मीच्या बेंगाल टायगर एट बगदाद झू या नाटकाने महोत्सवाचा दि. २१ जानेवारीला समारोप होईल. या दोन्ही नाटकांचे हे शुभारंभाचे प्रयोग असणार आहेत. या नाटकांसोबतच मोहित टाकळकर दिग्दर्शित आसक्त या संस्थेचे गजब कहानी हे हिंदीतील नाटकदेखील महोत्सवात सादर होणार आहे.
विनोदोत्तम करंडक विजेत्या एकांकिका चि. श्री व सौ साखरे आणि सिल्ड तसेच, राज्यातील एकमेव माईम प्लेची स्पर्धा असलेल्या मौनांतर करंडक स्पर्धेतील विजेते एमआयटी कॉलेजचे वॉर एण्ड पीस व थिएट्रॉन एंटरटेनमेंटचे सो वॉट या एकांकिका देखील महोत्सवात सादर केल्या जाणार आहेत. अश्विनी गिरी यांचे सोलो सादरीकरण असलेले वेणूनाद हे नाटक व अरुंधती पटवर्धन यांचे तुका म्हणे हे नृत्याधारीत सादरीकरण पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.
पुरुषोत्तम करंडकासह रोटरी करंडक, भरत करंडक या इतरही स्पर्धांमध्ये अनेक बक्षिसे मिळविलेली बीएमसीसी कॉलेजची सॉरी परांजपे ही एकांकिका या महोत्सवाची रंगत आणखीनच वाढविणार आहे. हिंदी रंगभूमीवरील स्वतंत्र व नाट्यजंक्शन या दोन संस्था अनुक्रमे ‘जिसे लाहोर न देख्या वो जम्या नही’ व ‘नवाब की अकल गधों की शकल’ ही दोन नाटके सादर करतील. महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे ‘भूमिका’ व ब्लिंकिंग स्पॉट प्रॉडक्शनचे ‘आता काय करायचं राव’ ही दोन नाटकेसुद्धा महोत्सवात सादर केली जाणार आहेत.
राज्य नाट्य स्पर्धेतील पुरस्कारविजेती ‘द गिफ्ट’ व ‘कुलकर्णी आणि कंपनी’ ही दोन नाटके महोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा रसिकांच्या भेटीला येत आहेत. व्होडाफोन रंगसंगीत स्पर्धेतील पुरस्कारविजेती कोलाज क्रिएशन्सची एकांकिका फॅन्टम महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सांगीतिकसूर छेडणार आहे. सलग दोन वर्षे पुण्यातील दाजीकाका गाडगीळ करंडक मारणारी औरंगाबादची संस्था नाट्यवाडा पाझर व मॅट्रिक या त्यांच्या दोन्ही करंडक विजेत्या एकांकिका ते महोत्सवात सादर करतील.