...अन्यथा शासनाचे ग्रंथमित्र पुरस्कार परत करणार; ग्रंथमित्रांचा इशारा, मुख्यमंत्र्यांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 02:52 PM2018-02-01T14:52:25+5:302018-02-01T14:55:14+5:30
ग्रंथालय व कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीतर, शासनाने उत्कृष्ट सेवेबद्दल प्रदान केलेले शासनाचे ग्रंथमित्र पुरस्कार परत करण्याचा इशारा राज्यातील ग्रंथमित्रांनी दिला आहे.
चाकण : ग्रंथालय व कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीतर, शासनाने उत्कृष्ट सेवेबद्दल प्रदान केलेले शासनाचे ग्रंथमित्र पुरस्कार परत करण्याचा इशारा राज्यातील ग्रंथमित्रांनी दिला आहे. १७ फेब्रुवारीला सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी अधिवेशन सोलापूर येथे होणार आहे. सोलापूर कृती समितीने मागण्यांचे व पुरस्कार परत करण्याबाबतचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
ज्ञानदानाचे सर्वात मोठे कार्य जर कुठे होत असेल तर ते म्हणजे ग्रंथालयातून. मात्र हीच ग्रंथालये आज उपेक्षित आहेत. सरकारने ग्रंथमित्र पुरस्कार देऊन काम करणाऱ्यांचा सन्मान केला, मात्र सन्मानाने पोट भरते का? असा सवाल सोलापूर येथे १७ फेब्रुवारीला होणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रंथालय अधिवेशनाचे निमंत्रक राजकुमार हंचाटे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे केला.
राज्यातील ग्रंथालय कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू करावी. तोपर्यंत किमान वेतन कायद्याप्रमाणे देण्यात यावे. अनुदानात दुप्पट वाढ करावी, कर्मचाऱ्यांचे वेतन आॅनलाईन मिळण्याची कार्यवाही व्हावी. नवीन मान्यता व वर्गवाढ त्वरित चालू करावी. सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघटनेस शासकीय मान्यता मिळावी. कर्मचाऱ्यांचा सामुदायिक विमा उतरविण्याची कार्यवाही व्हावी. ग्रंथालयातील कर्मचारी यांच्या पदावरील व्यक्तीला मान्यता मिळण्याची कार्यवाही व्हावी. आदी मागण्या समितीने या पत्राद्वारे केल्या असल्याची माहिती खेड तालुक्यातील ग्रंथमित्र रमेश सुतार यांनी दिली.
वेतनश्रेणी, अनुदान दुप्पट वाढ, ओळखपत्र, तपासणी कार्यक्रमाचा प्रश्न, प्रवास खर्च, नवीन मान्यता व वर्गवाढ, सामुदायिक विमा, अहवाल तपासणी प्रश्न, संघटनेस सरकारी मान्यता मिळावी आदी मागण्या सोलापूर अधिवेशन कृती समितीने सरकारला दिल्या असून याबाबत अधिवेशनात आवाज उठविण्यात येणार आहे. यावेळी रवींद्र कामत, सुनील कुबल, रमेश जनबंधू, भीमाशंकर बिराजदार, नंदू बनसोडे, रमेश सुतार, बेडगनुर, गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.